अखिल आगरी समाज परिषदेचा इशारा
नवी मुंबईत गावठाणाबाहेर गरजेपोटी ३७ हजार घरे बांधण्यात आली असून ती घरे नियमित करावीत, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष श्याम म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
अखिल आगरी समाज परिषदेची एक दिवसीय जनरल कौन्सिल सभा १० मे रोजी नेरुळ येथील आगरी कोळी सांस्कृतिक भवन येथे होणार आहे. सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान पहिले सत्र होणार असून दुपारी ३ ते ६ या वेळेत दुसरे सत्र होणार आहे. या सभेमध्ये समाजामधील नवश्रीमंतीमुळे निर्माण झालेल्या ज्वलंत समस्यांवर चर्चा केली जाणार आहे. कालबाह्य़ झालेल्या रूढी-पंरपरा तसेच अलीकडे नव्याने निर्माण झालेली संकटे  या विषयांवर विचारविनिमय केला जाणार आहे.
अनेक जिल्ह्य़ांतील सामाजिक, आर्थिक, भूसंपादन आणि विविध दैनंदिन प्रश्नांना गंभीर स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यामुळे आगारी समाजाचे अस्तित्व धोक्यात आले असून या प्रश्नांना संघटितरीत्या तोंड देण्याची गरज आहे. या सर्व समस्यांचा विचार करून त्या सोडविण्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यासाठी आगरी समाज परिषदेची जनरल कौन्सिल सभा आयोजित केली आहे.
साखरपुडा तसेच हळद आणि विवाह समारंभ यांवर भरमसाट पैसा खर्च केला जातो, यावर र्निबध घालण्यात यावेत. अंधश्रद्धा, धार्मिक अनिष्ट रूढी व कालबाह्य़ गोष्टींच्या पंरपरा बंद कराव्यात. दुखवटा कार्यक्रमामध्ये वस्तूभेट, कपडे भेट व मोठय़ा प्रमाणात चैनीच्या वस्तू देण्यावर र्निबध घालावेत यांसारख्या आगरी समाजाला भेडसावणाऱ्या विषयांवर निर्णय घेण्यात येणार आहे, असे श्याम म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या सभेला समाजातील आजी-माजी मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी उपिस्थत राहणार आहेत.