राज्य सरकारच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या क्रीडा नपुण्याला वाव देण्यासाठी प्रत्येक विभागात क्रीडास्पर्धा आयोजनासाठी त्या त्या सचिवांकडे एक कोटी रुपये निधी देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी येथे केली.
राज्य सरकारने विविध खेळांना प्रोत्साहन देतानाच खेळाडूंना नोकरीत ५ टक्के जागा आरक्षित केल्या आहेत, असेही पवार म्हणाले. लेखा व कोषागारे अधिकारी-कर्मचारी यांच्या राज्यस्तरीय क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील भारतीय खेल प्राधिकरणाच्या मदानावर या स्पर्धा आयोजिल्या आहेत. आमदार सतीश चव्हाण, लेखा व कोषागार संचालक स.अ.मु.नकवी, कर्मचारी कल्याण समितीचे कार्याध्यक्ष रवींद्र धोंगडे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी आदी उपस्थित होते. उद्घाटन सोहळयास राज्यभरातून अधिकारी-कर्मचारी खेळाडू उपस्थित होते. खेळाडूंच्या पथकांनी संचलन करून उपमुख्यमंत्री पवार यांना मानवंदना दिली. पवार यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.