दिवसाढवळ्या घरफोडय़ा करून किमती दागिन्यांसह लॅपटॉप, एलसीडी, मोबाइल आदी ऐवज हातोहात लांबिवणाऱ्या आंतरजिल्हा गुन्हेगार टोळीला सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीकडून घरफोडय़ांचे पंधरा गुन्हे उघडकीस आले असून यात सात तोळे सोने, रोख रक्कम, आठ लॅपटॉप, दोन एलसीडी, दहा मोबाइल व गुन्ह्यात वापरलेल्या झायलो मोटारीसह बारा लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
या टोळीने सोलापूर जिल्ह्यात कुर्डूवाडी व सोलापूर शहरासह पुणे, नागपूर, नांदेड, अहमदनगर, उस्मानाबाद आदी भागात घरफोडय़ा केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. लातूर जिल्ह्यात राहणाऱ्या या टोळीचा प्रमुख सूत्रधार राहुल विष्णुकांत चंद्रपाटले (वय २१) व त्याचा भाऊ सुदर्शन चंद्रपाटले (वय १९) यांच्यासह इर्शाद आलम शेख (वय २०), नितीन बिभीषण जनगावे (वय १९, रा. वडवळ नागनाथ, ता. चाकूर, जि. लातूर), नितीन राम इंचुरे (वय १९, रा. लासुर्णा, ता. देवणी, जि. लातूर), संतोष उद्धव मुरकुटे (वय १८), गोिवद उद्धव मुरकुटे (वय २०, रा. रायेवाडी, ता. चाकूर), राहुल तुकाराम मोडक (वय ३२)  व प्रदीप श्रीमंत मेकले (वय २३, रा. हडपसर, पुणे) अशा नऊ जणांना तुळजापूर रस्त्यावर उळेगाव येथे शीतल हॉटेलसमोर सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत कुर्डूवाडी येथे गेल्या २४ ऑगस्ट रोजी रामचंद्र पांडुरंग मिरगणे यांच्या चार लाख ८८ हजारांच्या घरफोडीचा गुन्हा याच टोळीने केल्याचा संशय बळावला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अप्पासाहेब शेवाळे व त्यांच्या पथकाने या टोळीला जेरबंद करून पोलिसी हिसका दाखविला. त्यातून कुर्डूवाडीच्या घरफोडीसह अन्य जिल्ह्यातील घरफोडय़ांचेही गुन्हे याच टोळीने केल्याचे उघडकीस आले. या टोळीकडून मिहद्रा झायलो कंपनीची मोटार (एमएच १२ एफ झेड ८३७) तसेच ८ लॅपटाप, २ एलसीडी, ७ तोळे सोन्याचे दागिने, १० मोबाइल संच असा सुमारे १२ लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.
कुर्डूवाडीत मिरगणे यांच्या घरफोडीत या टोळीने २४ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले होते. हा गुन्हा टोळीने कबूल केला असुन शिवाय अन्य जिल्ह्यांतील १५ ते १७ गुन्हेही केल्याचे या टोळीने पोलीस प्राथमिक तपासात कबूल केल्याचे पोलीस निरीक्षक अप्पासाहेब शेवाळे यांनी सांगितले. यात नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाणे व नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत या टोळीने २ घरफोडय़ा केल्या. तसेच वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतही घरफोडी केल्याचे टोळीचा सूत्रधार राहुल चंद्रपाटले याने कबूल केले. तसेच सोलापूर शहरात विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन घरफोडय़ा तर जोडभावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भवानी पेठेत एक घरफोडी या टोळीने केल्याचे निष्पन्न झाले. तुळजापुरातही या टोळीने घरफोडी केली असून शिवाय नागपुरातही आर.पी. नगर , सोनेगाव, धंतोली भागात घरफोडय़ा केल्याचे या टोळीने कबूल केले आहे. पुण्यात हडपसर परिसरात व नगर जिल्ह्यात या टोळीने घरफोडय़ा केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाल्याचे पोलीस निरीक्षक शेवाळे यांनी सांगितले.
या टोळीचा सूत्रधार राहुल चंद्रपाटले, सुदर्शन चंद्रपाटले व नितीन जनगावे यांच्याविरुद्ध लातूर येथे विविध पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडय़ांसह जबरी चोऱ्यांचे गुन्हे दाखल आहेत. या टोळीला जेरबंद करण्यासाठी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राजेश प्रधान व अपर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत पथकात पोलीस निरीक्षक शेवाळे यांच्यासह उपनिरीक्षक संजीव झाडे, महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल घोगरे, सहायक फौजदार शरद िशदे, हवालदार अल्ताफ काझी, संजय भंडारे, सुनील साळुंखे, अजय वरपे, फयाज बागवान, मोहन मनसावाले, इस्माईल शेख, केशव पवार, गांगुर्डे यांनी भाग घेतला होता.