मंडळ किंवा महामंडळांवर वर्णी लागावी म्हणून जिल्ह्य़ातील भाजपचे आमदार मोर्चेबांधणी करीत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यमंत्रीपदाचा दर्जा असणाऱ्या मंडळाच्या अध्यक्षपदावर मुन्ना यादव यांच्या रूपात आपल्या समर्थकाची वर्णी लावून गडकरी गटाला थेट शह दिल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्र्यांचे कट्टर समर्थक व कधी काळी त्यांचे खासगी सुरक्षा रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडणारे अजनी भागाचे नगरसेवक ओमप्रकाश उपाख्य मुन्ना यादव यांची अलीकडेच शासनाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकार मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती पुढच्या काळात पक्षातील अंतर्गत धुसफुसीला तोंड फोडणारी ठरू शकते.
सत्तेपासून अनेक वर्षे दूर राहिल्यानंतर आता संधी मिळाल्याने भाजपच्या जिल्ह्य़ातील लोकप्रतिनिधींची सत्तेच्या पदासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री नागपूरचे असल्याने आमदारांच्या अपेक्षा थोडय़ा अधिक वाढल्या आहेत. सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, सुधीर पारवे आदी दुसऱ्यांदा निवडून आलेल्या गडकरी समर्थक आमदारांचा नियुक्यांच्या वेळी प्राधान्याने विचार होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र यादव यांच्या नियुक्तीने सर्वानाच धक्का बसला. त्यामुळे एकीकडे आमदारांमध्ये नाराजी आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी आपल्या समर्थकाची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करून एकप्रकारे शहरातील गडकरी गटाला शह दिला आहे, अशी चर्चा भाजपच्या अंतर्गत वर्तुळात आहे.
पक्षाचे शहर अध्यक्ष कृष्णा खोपडे यांचे नाव सुरुवातीला मंत्रिपदाच्या शर्यतीत होते. पण गडकरी मुख्यमंत्री झाल्यास त्यांच्यासाठी आपण राजीनामा देऊन मतदारसंघ रिकामा करून देऊ, अशी घोषणा खोपडे यांनी केली होती व त्यामुळे त्यांचे नाव यादीतून गळले. मंडळाचे अध्यक्षपद देऊन त्यांची नाराजी दूर केली जाईल, असे पक्षातच बोलले जात होते. पण अद्याप त्यांच्या हाती काहीही पडले नाही. खोपडे यांच्या प्रमाणेच विकास कुंभारे यांची अवस्था आहे. त्यांनाही नवीन जबाबदारी दिली जाईल, असे पक्षातून संकेत मिळाले होते. पण त्यांच्या नावाचा विचार अद्याप झाला नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुन्ना यादव यांना नागपूर सुधार प्रन्यासवर विश्वस्त म्हणून घेण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र सध्या हे पद नगरसेवक छोटू भोयर यांच्याकडे आहे व ते भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. विलास डांगरे यांचे नातेवाईक आहे. त्यामुळे त्यांना हात लावणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांना महापालिकेत उपनेतेपद देण्यात आले. पण त्यावर यादव समाधानी नव्हते.
त्यामुळे त्यांना थेट मंडळच देण्यात आले. मंडळावर मालकांचे प्रतिनिधी म्हणून नागपूरचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रभाकरराव मुंडले, पुण्याच्या मेघा धवल, सतीश मगर यांची तर कामगारांचे प्रतिनिधी म्हणून अशोक भुताड (नागपूर), श्रीपाद कुसाटकर (मुंबई) आणि विनय देवरूखकर (मुंबई) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.