समाजामध्ये स्त्रियांना भयमुक्त जीवन जगण्यासाठी व त्यांचे पूर्णपणे सक्षमीकरण होण्यासाठी पुरुषांची व कुटुंबांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे, असे मत जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. आर. लोंढे यांनी गुरुवारी व्यक्त केले.
येथील शासकीय तेजस्विनी महिला वसतिगृहात सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. श्री. लोंढे यांच्या हस्ते विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
महिलांसाठी लवकरच स्वतंत्र न्यायालय सुरू करण्याचे विचाराधीन असल्याचे नमूद करून लोंढे म्हणाले, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले काम अतुलनीय असून त्यांचा वारसा पुढे चालू ठेवण्यास महिलांनी पुढाकार घ्यायला हवा. एखाद्या महिलेवर अन्याय झाल्यास तिने कायद्याचा आधार घेऊन लढणे व न्यायदान प्रक्रियेत निर्भिडपणे सत्य सांगणे आवश्यक आहे.
यावेळी जिल्हा परिविक्षा अधिकारी शिवाजी खुडे, बालविकास प्रकल्प अधिकारी शिल्पा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
वसतिगृहाच्या अधिक्षिका ज्योती पाटील यांनी महिलांचे अधिक सक्षमीकरण होण्यासाठी संस्थेसाठी जागा व सुसज्ज इमारतीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. परिविक्षा अधिकारी श्रीमती पी. वाय. पाटील यांनी आभार मानले.