चालू वर्षीचा कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २० ते २७ डिसेंबर या कालावधीत होणार आहे, अशी माहिती कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटीच्या वतीने देण्यात आली.
कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्स सोसायटी गेली दहा वर्षे सातत्याने चांगल्या चित्रपटांसाठी रसिकप्रेक्षकांची चळवळ चालवित आहे. त्यातूनच सलग २००९ ते २०११ या तीन वर्षांत एक आंतरराष्ट्रीय व तीन थर्ड आय एशियन चित्रपट महोत्सव भरविले. रसिक प्रेक्षकांचा अतिशय उत्तम असा वाढता प्रतिसाद मिळत आहे. या कामी जिल्हा प्रशासन, राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्ट व गेल्या वर्षीपासून अखिल भारतीय मराठी चित्रपट आणि कोल्हापूर महापालिका यांचे सहकार्य लाभले आहे.
चालू वर्षीच्या महोत्सवात वर्ल्ड सिनेमा विभागात १० आंतरराष्ट्रीय, विविधभारती विभागात भारतीय भाषांतील सात, मायबोली मराठी विभागात नवीन सात, कंट्री फोकसमध्ये तैवान चार, तर दिग्दर्शक मागोवामध्ये भारतीय, एशियन व विदेशी अशा तीन दिग्दर्शकांचे प्रत्येकी तीन चित्रपट असतील. शताब्दी वर्षांनिमित्त क्लासिक गॅलरी विभागात सहा भारतीय चित्रपट ज्यातून शंभर वर्षांतील बदलता प्रवाह व टप्पे लक्षात येतील. सुमारे ७० लघुपटही असणार आहेत. शिवाय फाळके पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे एक प्रदर्शनही असेल.
सात दिवसांच्या या महोत्सवात एकूण १०५ शो होणार आहेत. त्याचबरोबर चित्रपट क्षेत्रात विशेष कार्य केलेल्या व्यक्तींना कलामहर्षी बाबुराव पेंटर व आनंदराव पेंटर असे दोन पुरस्कार देण्यात येणार आहेत. मायबोली मराठी चित्रपटांसाठी सवरेत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री असे प्रेक्षक पसंतीसह परीक्षक पुरस्कारही देण्यात येणार आहेत.