News Flash

चित्रपट पंढरीत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

मराठी चित्रपटांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या देशातील मोजक्या शहरांत मानाचे स्थान प्राप्त होऊ लागले आहे.

| December 20, 2013 02:15 am

चित्रपट पंढरीत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

मराठी चित्रपटांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणा-या कोल्हापूरला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या देशातील मोजक्या शहरांत मानाचे स्थान प्राप्त होऊ लागले आहे. देश-विदेशातील चित्रपट सुजाण रसिकांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच मनोरंजनाच्या पलीकडे आशयघन चित्रपटनिर्मितीची प्रेरणा देण्यासाठी हा महोत्सव मोलाची कामगिरी बजावणार आहे. चित्रपटांच्या जोडीला उत्तमोत्तम लघुपटांचे सादरीकरण होऊन याही विश्वाचा धांडोळा यानिमित्ताने घेता येणार आहे. धार्मिक व गडकिल्ल्यांच्या पर्यटनाच्या पलीकडे जाऊन कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटकास चित्रपटांविषयीची समग्र माहिती देणारे केंद्र स्थापित व्हावे, असा व्यापक उद्देशही गुरुवारपासून आठवडाभर चालणाऱ्या चित्रपट महोत्सव भरविण्यामागे आहे.    
करवीरनगरीतील चित्रपटनिर्मितीची परंपरा खूप मोठी असल्याने ऐतिहासिक स्थानही प्राप्त झाले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीची शताब्दी पार झाल्यानंतर आता चित्रपटसृष्टीत डिजिटल युग सुरू झाले आहे. चित्रपटातील या बदलत्या अवकाशाचा परिचय नव्या पिढीला घडविण्यामध्ये चित्रपट महोत्सव उल्लेखनीय कामगिरी करीत आहे. मराठी चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रामध्ये हौस म्हणून काम करणारा युवावर्ग मोठय़ा प्रमाणात असला तरी तो मराठीच्या मनोरंजनात्मक निर्मितीच्या प्रक्रियेत अडकला आहे. गेल्या पाच वर्षांत चांगल्या साहित्यकृती निवडून त्यावर चित्रपट बनविणारे दिग्दर्शकही पुढे आले आहेत. त्यामुळे तांत्रिक अंगाने सुधारलेला मराठी चित्रपट आशयघनतेतही सुधारलेला आहे. अशा स्थितीत चित्रपट महोत्सवाचे महत्त्व ठळकपणाने जाणवते. जगातील, भारताच्या विविध प्रांतांतील चित्रपटांतून मांडला जाणारा आशय, तेथील भौगोलिक, सामाजिक, राजकीय स्थिती, भाषा, चालीरीती यांची वैविध्यता चित्रपट महोत्सवातून पाहायला मिळते. याचे अवलोकन करून आपला चित्रपटही तुलनात्मकरीत्या कसा असला पाहिजे याच्या अभ्यासाची संधीही सलग आठवडाभर चालणाऱ्या महोत्सवाद्वारे प्राप्त झाली आहे.    
मराठी चित्रपटाची गुणात्मक वाढ होत चालली असून, त्यातील निवडक चित्रपट व्हेनिस, फ्रान्स, ऑस्कपर्यंत पोहोचू लागले आहेत. तेथील पुरस्काराचे महत्त्व आपल्याला इतक्या मोठय़ा प्रमाणात जाणवत असेल तर जागतिक स्थानावर आपल्याही पुरस्काराचे महत्त्व तितक्याच कौतुकाने गाण्याची गरज निर्माण झाली आहे. यादृष्टीने असा पुरस्कार देण्याचे नियोजन असल्याचेही बाबुराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी यांनी सांगितले. चित्रपटविषयक सांस्कृतिक देवाणघेवाणीचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून कोल्हापूर उदयास यावे यासाठी सुरू झालेल्या या प्रयत्नाचे यश सुजाण रसिकांच्या प्रतिसादावरच अवलंबून राहणार आहे.

चित्रपट अभ्यासकांची हजेरी

येथे भरणाऱ्या चित्रपट महोत्सवात विदेशी चित्रपट अभ्यासकही हजेरी लावू लागले आहेत. गतवर्षी गोवा येथे चित्रपट महोत्सवासाठी आलेले इस्त्रायलचे ज्युरी डॅन वुल्मन यांनी कोल्हापुरातील चित्रपट महोत्सवालाही हजेरी लावली. विमानसेवा नसतानाही कोल्हापुरात रेल्वेने येऊन इथल्या चित्रपट महोत्सव व चित्रपटसृष्टीची सविस्तर माहिती घेतली. विदेशी अभ्यासकांनी इथल्या महोत्सवात उपस्थिती वाढवावी यासाठी संयोजकांचेही प्रयत्न सुरू आहेत. मुंबई, कोलकाता, चेन्नई, केरळ, बंगलोर, पुणे येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांपेक्षा कोल्हापूरचे वेगळे स्थान निर्माण व्हावे, या दिशेने पावले पडत आहेत. चित्रपटनिर्मितीची शतकभराकडची वाटचाल करणाऱ्या या नगरीतील चित्रपटनिर्मितीच्या प्रवासाचे दर्शनचित्रपट महोत्सवासाठी येणाऱ्यांना व्हावे यासाठी एक स्वतंत्र आराखडा बनविला जाणार असल्याचे संयोजक चंद्रकांत जोशी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.    
लघुपटाचे जगही आता चांगल्या प्रमाणात विस्तारत चालले आहे. भारतीय लघुपटाचा प्रवास नेमक्या कोणत्या दिशेने होत आहे याचे दर्शन महोत्सवाच्या निमित्ताने भरविण्यात येणाऱ्या लघुपट विभागातून घडविले जाणार आहे. विविध भारतीय भाषांमध्ये निर्माण झालेल्या लघुपटांचा अभिरुचिसंपन्न रसास्वाद घेण्याची संधी येथे उपलब्ध करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळ, चेन्नई, गोवा, महाराष्ट्र येथून सादर झालेल्या ११२ लघुपटांपैकी निवडक ३६ लघुपट येथे सादर होणार आहेत.     

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2013 2:15 am

Web Title: international film festival in kolhapur
टॅग : Kolhapur
Next Stories
1 कोल्हापुरात शिवसेनेचा जनावरांचा मोर्चा
2 कार्यकर्ते, प्रशासकीय अधिका-यांचा सत्कार
3 सांगली महापालिकेची आजची सभा गाजणार
Just Now!
X