कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात शनिवारी एकाच दिवशी तीन स्त्री अर्भकांचे शवविच्छेदन करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ‘लोकसत्ता’ने हे वृत्त प्रसिद्ध करताच रविवारी सकाळपासून शासनाच्या आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेची पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. याप्रकरणी सविस्तर अहवाल पाठविण्याचे आदेश पालिकेला देण्यात आल्याचे सांगण्यात येते.
महिला संघटनांनीही या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल घेतली आहे. कल्याण परिसरातील पिसवली, वरप आणि कल्याणमधील बेतुरकरपाडा भागातील तीन दाम्पत्यांनी आपली अल्प दिवसाची स्त्री अर्भके शवविच्छेदनासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात शनिवारी आणली होती. एकाच दिवशी ही अर्भके शवविच्छेदनासाठी आणल्याने पालिकेत खळबळ उडाली होती.
पालिकेच्या दोन डॉक्टर्सनी या तिन्ही अर्भकांचे शवविच्छेदन केले. यामध्ये गर्भाची पूर्ण वाढ होण्यापूर्वीच एका बाळाचा जन्म झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे. एका बाळाचा गुदमरून तर एका बाळाच्या डोक्याला, मेंदूला मार लागल्याने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले असल्याचे रुग्णालय सूत्रांकडून समजते.
रविवारी सकाळपासून आरोग्य विभागाचे उपसंचालक, शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पालिका अधिकाऱ्यांशी दूरध्वनी करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. शासनाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल घेतली आहे. स्थानिक पोलीसही या तिन्ही स्त्री अर्भकांच्या मृत्यूचे अहवाल, त्याची कारणे याबाबतची माहिती देण्यासाठी रविवारी दिवसभर धावपळ करीत होते. याबाबत मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लीलाधर म्हस्के यांनी सांगितले, याबाबत चौकशी वगैरे नाही, पण एक ईमेल आला आहे. कार्यालयात गेल्यानंतर ते निष्पन्न होईल.