चांदवड येथील शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या त्या मुलाला अभ्यासापेक्षा चित्रे काढण्याचीच भारी हौस. घरची परिस्थिती जेमतेम. त्यामुळे रंगपेटी, वॉटर कलर, चांगला ब्रश घेण्याच्या त्याच्या साऱ्या इच्छांचा शालेय जीवनात बेरंग झाला. पोरगं पुस्तक हातात घेण्याऐवजी चित्र काढत बसतो म्हणून आईने त्याच्या चित्रकलेची वही चुलीत घातली होती. पण त्यामुळे चित्रकलेविषयीचे नाते कमी न होता अधिकच गडद होत गेले. शेतीवर पोट असल्यामुळे घरची अर्थव्यवस्था कायमस्वरुपी ढासळलेली. त्यामुळे शालेय जीवनातच कुठे दुकानांच्या पाटय़ा रंगव, कुठे मूर्तीना रंगकाम कर, अशी कामे करू लागला. पावसाळ्यात घर खूप गळायचे. झोपायलाही जागा नसायची. त्याच्या शेजारी शेळ्या बांधलेल्या असायच्या. अशा परिस्थितीत विचारांचे काहूर त्याच्या डोक्यात उठे. त्यातूनच त्याला कविता सूचू लागली. त्यातून त्याचं आशावादी मन प्रगटायचं. ‘स्वप्नांच्या जळाया ज्योती डोक्यात प्राण पेरावा, अंधार भेदण्यासाठी सूर्याचा हात धरावा’ हे त्याचे शब्द त्यालाच प्रेरणादायी ठरत गेले. ‘सरेल अंधार येईल प्रकाश’ म्हणत त्याने जिद्दीने शिक्षण पूर्ण केले. काव्य क्षेत्रातही त्याला चांगले नाव मिळाले. त्याच्यातील सर्जनशील कलावंताने त्याला आज महाराष्ट्रीय उत्तम मुखपृष्ठकार म्हणून नाव मिळवून दिले. हा मनस्वी कलावंत म्हणजे विष्णू थोरे.
एकीकडे शेतात बैलांना चारा देणे, कांद्याला पाणी देणे अशी कामे करतानाच दुसरीकडे त्याचे जादुई हात ‘पॉप्युलर’ किंवा ‘शब्दालय’च्या दर्जेदार पुस्तकांचे मुखपृष्ठ रेखाटण्यात गुंतलेले असतात. राजन गवस यांच्यासह अनेक मान्यवरांच्या सिद्धहस्त पुस्तकांची मुखपृष्ठे चांदवड येथील विष्णू थोरेच्या शेतातील छोटय़ाशा घरात साकारली आहेत. विष्णू म्हणजे जणू एक जादुगार. त्याच्या कवितांच्या, चित्रांच्या पोतडीतून एक एक असे काही बाहेर पडते की वाचणारा व पाहणारा हरखूनच जातो. त्याचा ध्यासही वेगळा. तो म्हणतो, ‘शेतात रहायचं पण जागतिक व्हायचं’, म्हणूनच की काय त्याच्या शेतात विखरणीचे काम सुरू असते तेव्हा जवळच्याच खोलीत हे महाशय इंटरनेटच्या माध्यमातून ग्लोबल झालेले दिसतात. फेसबूकच्या माध्यमातून जेव्हा त्याच्या कविता जगभर पसरतात त्यावेळी तो शेतात निघालेल्या सापावर पुढील प्रक्रिया करण्यात मग्न झालेला असतो. रामदास फुटाणे, अरूण म्हात्रे, प्रशांत मोरे यांसारख्या मान्यवर कविंबरोबर महाराष्ट्रात सर्वदूर काव्य मैफली सजविणारा कलासक्त विष्णू आर्थिक स्थैर्य नाही म्हणून खंत व्यक्त करतो तेव्हा गलबलून येते.
अर्थकारणासाठी विष्णूने बरेच काही केले. एम.ए. मराठी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरीसाठी बरीच धडपड केली. अर्थार्जनासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांच्या भिंती रंगविल्या. उत्तम सूविचारांनी फलक जिवंत केले. सर्व शिक्षा अभियानामार्फत वीस शाळांच्या परिसरात त्याने नवे रंग भरले. पण शाळांमध्येच चित्रकला शिक्षक आल्याने आता ते काम हातातून गेल्याचे तो सांगतो. गणेशोत्सव, निवडणुकांमध्ये कापडी फलक रंगविणे हा उत्पन्नाचा मार्ग. तिथेही त्याने मेहनत केली. पण अलीकडे डिजिटल बॅनर आल्याने त्या व्यवसायवरही परिणाम झाला.
एकत्र कुटुंब. शेतीवर गुजराण. त्यामुळे परिस्थिती यथातथा. लासलगाव, चांदवड महाविद्यालयात काही दिवस प्राध्यापक म्हणून त्याने काम केले. पण नेट-सेट, बीएड् नसल्याने ते कामही सोडावे लागले. आर्थिक ओढाताणीमुळे बीएड् कसे करायचे आणि ते पूर्ण झाल्यावरही नोकरी लागण्यासाठी पुन्हा पैसे कुढून आणायचे? हा विष्णूचा प्रश्न अनुत्तरीत करणारा आहे. गुणवत्ता असूनही हा कवी मनाचा संवेदनशील प्राध्यापक सध्या घरीच आहे. शेती व चित्रकलेच्या जोडीला कविता, सूत्रसंचालन हे त्याचे उत्पन्नाचे मार्ग. विष्णू सध्या आघाडीचा मुखपृष्ठकार बनलाय ही त्यातल्या त्यात आनंदाची बाब. संदीप जगताप यांच्या ‘भूईभोग’ तसेच प्रा. विलास थोरात यांच्या ‘शरसंधान’ पुस्तकाचे मुखपृष्ठ त्याने काढले आणि साहित्य विश्वात दिमाखात पाऊल ठेवले. त्यानंतर मग एकापेक्षा एक सरस अशा मुखपृष्ठांची त्याच्या घरात स्पर्धा सुरू झाली. ऐश्वर्य पाटेकर यांच्या ‘भूई शास्त्र’ या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार बहाल झाला. त्या पुस्तकाचे मुखपृष्ठ विष्णूच्याच कुचल्यातून उतरले आहे.
‘पाऊस वाटेच्या भरवशावर’ हे जितेंद्र लाड यांचे पुस्तक असो की ‘थुई थुई’ हा सिसिलिया काव्‍‌र्हालो यांचा संग्रह. मुखपृष्ठासह आतील रेखाटने विष्णूनेच साकारली. विशेष म्हणजे पॉप्युलर प्रकाशनच्या ‘ब-बळीचा’ या राजन गवस यांच्या पुस्तकाचे मुखपृष्ठही विष्णूने रेखाटले आहे. कॉलेज जीवनात ज्या लेखकाचे ‘कळप’ हे पुस्तक सतत बरोबर घेऊन हिंडायचो. त्या आवडत्या लेखकाच्या पुस्तकासाठी काम करायला मिळणे हेच विष्णूला मोठे ‘मानधन’ वाटते. पॉप्युलर प्रकाशनतर्फे ‘आमच्यासाठी काम करणार का ?’ अशी विचारणा करणारा दूरध्वनी आला. हा दूरध्वनी म्हणजे या तरुण कलावंताला त्याच्या आयुष्यातील संचित वाटते. कवी असल्याने प्रतिके आणि प्रतिमा यांची ओळख आहे. तीच गोष्ट चित्रात वापरतो असे सांगणाऱ्या विष्णूच्या मुखपृष्ठाची साहित्य वर्तुळात चांगलीच चर्चा आहे. ‘तुझी रेषा संपन्न आहे. तु कुठे राहतो हे महत्वाचे नाही’ ही शब्दालयच्या सुमतीताई लांडेंची प्रतिक्रिया खूप बोलकी आहे. आता विष्णू यांच्यासह नारायणे सरांच्या ‘मनोमनी’ च्या बोलक्या मुखपृष्ठांव्दारे पुन्हा साहित्य प्रेमींच्या दरबारात दाखल होत आहे. चांदवडला रहाणाऱ्या व शेती-मातीत रुजलेल्या या तरुणाचा प्रवास असा सुरू आहे.
जीवनात आर्थिक स्थैर्य नाही. कामात पुरेसे पैसे नाही. पण जे करतोय त्यात खूप समाधान व आनंद आहे. पैशांअभावी ना कला महाविद्यालयात जाता आले ना ऑईल कलर हाताळता आले. नाहीतर चित्रकला क्षेत्रात यापुढेही मजल मारली असती हे सांगायला तो विसरत नाही. कष्टाने, धडपडीने, आशावादी राहिल्याने इथपर्यंत आलेल्या या सृजनशील तरुणाच्या बोटांमधील जादू दाद देण्याजोगी आहे. दत्ता पाटील यांनी आपली रेखाटने वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली. त्यामुळे पहिल्यांदा मानधन सुरू झाले हे भावविवश होऊन आठवतानाच कलावंतांना सन्मानाबरोबरच त्याच्या कलेचा यथायोग्य मोबदला मिळायलाच हवा अशी ठाम मागणी करणारा विष्णू आजही स्थैर्य देणाऱ्या नोकरीच्या शोधात आहे.