प्रशासकीय मान्यता नसतानाही परिवहन सेवेतील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाढीव वेतनश्रेणीचे वेतन अदा करण्यात आले असून ते नियमबाह्य़ असल्याचा आरोप परिवहन सदस्यांनी मंगळवारच्या बैठकीत केला. या प्रकरणी महापालिका मुख्य लेखा परीक्षकांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समिती नेमून चौकशी करावी, अशी मागणीही सदस्यांनी केली. तसेच परिवहन व्यवस्थापकांचा आदेश अमलात आणू नये, अशी लेखी टिप्पणी करणाऱ्या उपव्यवस्थापकांची महापालिका आयुक्तांकडे तक्रार करण्याचा निर्णयही सदस्यांनी यावेळी घेतला.
ठाणे परिवहन सेवेतून सेवानिवृत्त झालेले उपव्यवस्थापक कमलाकर दीक्षित, निलंबित मुख्य लेखापाल अजित निऱ्हाळी आणि वैद्यकीय रजेवर असलेले कर्मचारी व प्रशासन अधिकारी दामोदर नानकर या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रशासकीय मान्यता नसतानाही वाढीव वेतनश्रेणीचे वेतन अदा करण्यात आले असून ते नियमबाह्य़ आहे, असा आरोप परिवहन सदस्य अजय जोशी यांनी केला.
 या प्रकरणी महापालिका मुख्य लेखा परीक्षकांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची एक समिती  नेमावी आणि चौकशी करून या प्रकरणातील उणिवा व दोष जाहीर करावेत, अशी मागणीही त्यांनी यावेळी लेखी पत्राद्वारे केली. त्याचप्रमाणे परिवहन सेवेच्या आस्थापना विभागातील ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मान्यता नसतानाही वाढीव वेतनश्रेणीची अंमलबजावणी केली, त्यांची चौकशी करून संबंधित दोषींवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.
ठाणे परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या रजेसंदर्भात व्यवस्थापकांनी आदेश काढला असून त्यावर उपव्यवस्थापकांनी लेखी टिप्पणी केली आहे. त्यामध्ये हा आदेश सध्या अमलात आणू नये, असे म्हटले आहे. त्यामुळे परिवहनचे व्यवस्थापक नक्की कोण आहेत, असा सवाल सदस्य भरत ठक्कर यांनी उपस्थित केला. तसेच उपव्यवस्थापकांनी आपल्या पदाच्या अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. दरम्यान, सर्वच सदस्यांनी उपव्यवस्थापकांच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त करत त्यांची महापालिका आयुक्तांकडे तक्रार करून चौकशीची मागणी करण्याचा निर्णय घेतला.
महिलांसाठी विशेष बससेवा
शहरातील महिलांसाठी विशेष बसगाडय़ा सुरू करण्याचा निर्णय मंगळवारच्या सभेत सर्वच परिवहन सदस्यांनी घेतला असून वागळे, मानपाडा, शिवाईनगर, पवारनगर, वृंदावन आदी मार्गावर ही बससेवा सुरू करण्यात येणार आहे. ठाणे स्थानकातून सकाळी सुटणाऱ्या लोकलच्या वेळेवर या बसगाडय़ांचे वेळापत्रक अवलंबून असणार आहे. या पूर्वीही अशा प्रकारची बससेवा सुरू होती, मात्र काही कारणास्तव बंद करण्यात आली होती.