वाढीव शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेबाहेर ताटकळत उभे करणाऱ्या ऐरोली येथील व्हीपीएम शाळेची ठाणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी पाच अधिकाऱ्यांच्या समितीद्वारे चौकशी करणार आहेत. दरम्यान दीड वर्षे वाढीव शुल्क भरण्याच्या नोटिसा देऊनही पालक शुल्क भरत नाहीत तर शाळा व्यवस्थापनाने काय करावे, असा सवाल व्यवस्थापनाच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.
ऐरोली सेक्टर १९ मधील व्हीपीएम शाळा व्यवस्थापनाने सोमवारी १२५ विद्यार्थ्यांना दिवाळीपूर्वी वाढीव शुल्क न भरल्याने प्रवेशद्वाराबाहेर ठेवले. त्यामुळे पालकांचा संताप अनावर झाला. त्यांनी प्रवेशद्वाराजवळ काही काळ धरणे धरले. पोलीस आणि शिक्षणाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीमुळे या विद्यार्थ्यांना वर्गात घेण्यात आले, पण वाढीव शुल्क भरण्याचा तगादा पुन्हा लावण्यात आला. मंगळवारीदेखील या विद्यार्थ्यांना काही काळ प्रवेशद्वाराजवळ मुजोर व्यवस्थापनाने एक तास बाहेर ठेवले. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला नोटीस बजावली असून अशा प्रकारे विद्यार्थ्यांना शाळेबाहेर ताटकळत ठेवणे गुन्हा असल्याचे नमूद केले आहे. विद्यार्थ्यांनी नियमानुसार शुल्क भरले नसेल तर त्यांच्या पालकांकडून ते वसूल करण्याची कार्यवाही करावी, पण विद्यार्थ्यांना शाळेबाहेर ठेवणे गैर आहे. विद्यार्थी शुल्क आणि देण्यात येणाऱ्या सुविधा यांची चौकशी करण्यासाठी उपजिल्हाधिकारी, प्राथमिक, माध्यामिक, शिक्षणाधिकारी आणि मुख्य लेखाधिकारी यांची एक समिती या शाळेच्या शुल्क समीकरणाची चौकशी करणार आहे.