सरकारी योजनेत निधी जिरतो, पण पाणी अडत नाही हा सार्वत्रिक अनुभव नवा नाही. परंतु केवळ दोन हजार रुपयांच्या स्वभांडवलावर नदीवर बांधलेल्या माती बंधाऱ्यातून हजारो लिटर पाण्याची साठवणूक करून तब्बल पाचशे एकर जमीन ओलिताखाली आणण्याची किमया तरुण शेतकऱ्याने केली. एवढेच नाही, तर परिसरातील विहिरी तुडुंब भरल्याने उन्हाळय़ातील पाणीटंचाईही यामुळे दूर होणार आहे. बीड तालुक्यातील लोळदगाव येथील तरुण शेतकरी शिवराम घोडके यांनी हे उदाहरण समोर ठेवले.
मागील अनेक वर्षांंपासून शेतीमध्ये वैविध्यपूर्ण प्रयोग करण्याचा घोडके यांना छंदच जडला आहे. सेंद्रिय शेतीत कृषिभूषण पुरस्कार मिळवलेल्या घोडके यांनी या वर्षी शेतीसाठी पाण्याची साठवणूक करण्याचा कमी खर्चातील लोळदगाव पॅटर्न विकसित केला. सरकारी योजनेत निधी जिरतो. मात्र, पाणी अडत नाही. पण घोडके यांनी लोळदगावजवळील लेंढी नदीवर अवघ्या दोन हजार रुपयांत स्वखर्चातून मातीचा बंधारा बांधला. या बंधाऱ्यात आता कोटय़वधी लिटर पाण्याची साठवणूक झाली. नदीतून वाहून जाणारे पाणी अडल्यामुळे आजूबाजूच्या विहिरी तुडुंब भरल्या. तसेच बंधाऱ्यातील पाण्यामुळे परिसरातील पाचशे एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. खूपच स्वस्तात बांधलेल्या बंधाऱ्याने परिसरात भाग्योदय घडला आहे. शरदअण्णा घोडके यांनीही याच धर्तीवर बंधारा बांधला. त्यातही पाण्याची साठवणूक झाली. त्यावरील नदीवर अजय घोडके यांनीही माती बंधारा बांधला. शिवराम घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली माती बंधाऱ्यांची साखळीच तरुण शेतकऱ्यांनी तयार केली. सरकारदरबारी न जाता स्वखर्चातून अत्यंत कमी पशात मातीचे बंधारे बांधल्याने परिसरात भूगर्भातील पाण्याची पातळी तर वाढलीच; पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही कायमचा सुटला आहे.