शहरात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी, मंगळसूत्र हिसकावणारी इराणी तरुणांची टोळी गुन्हे शाखेने गजाआड केली आहे. या टोळीचा नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १६ गुन्हय़ांमध्ये समावेश असून त्याच्याकडून तब्बल पाव किलो वजनाचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. शहरात वाढत्या सोनसाखळी हिसकावण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांनी उपायोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत. याच पाश्र्वभूमीवर सोनसाखळी चोरीच्या गुन्हय़ातील आरोपींचा गुन्हे शाखेकडून शोध सुरू होता. गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी म्रुंबा आणि आंबिवली परिसरात छापे मारत हैदरअली जाफरी, मुस्तफा जाफरी, मुस्लीम जाफरी, वसिम सय्यद आणि महंमद जाफरी या पाच इराणी तरुणांना ताब्यात घेतले. नवी मुंबईतील यापूर्वीच्या गुन्हय़ात त्यांचा सहभाग असल्याने त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हय़ांची कबुली दिली. त्यांच्याकडून सुमारे पाच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीकांत पाठक यांनी सांगितले. त्याच्याकडून आतापर्यंत १६ गुन्हय़ांची उकल करण्यास पोलिसांना यश आले असल्याचे त्यांनी सांगितले.   
वटपौर्णिमेच्या दिवशी संरक्षण देण्याची मागणी    
नवी मुंबई कार्यक्षेत्रात मागील काही वर्षांपासून महिलांचे मंगळसूत्र आणि सोनसाखळी हिसकावण्याच्या वाढत्या घटनांमुळे महिलावर्ग धास्तावलेला आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या वटपौर्णिमा सण आणि मागील अनुभव पाहता त्या दिवशी असे चोरीचे प्रकार घडू नयेत यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहरातील वटवृक्षाच्या ठिकाणी व महिलांची रहदारी अधिक असेल अशा ठिकाणी  पोलीस संरक्षणात वाढ करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील यांनी पोलीस आयुक्तांना केली असून या संदर्भात त्यांनी लेखी निवेदन दिले. सध्या शहरीकरणामुळे वटवृक्ष हे दुर्मीळ झाल्यामुळे महिलांना परिसराबाहेर लांब पल्ल्याची पायपीट करीत पूजेसाठी जावे लागते. याच गोष्टीचा फायदा सोनसाखळी चोर घेत असतात. गत वर्षी याच दिवशी आग्रोळी गावानजीक असणाऱ्या वटवृक्षाची पूजा करण्यासाठी जात असताना महिलेचे दहा तोळ्यांचे मंगळसूत्र चोरटय़ांनी हिसकावून पलायन केल्याची घटना घडली होती, अशा घटनांची पुनरावृत्ती शहरात कुठेही होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणेने आपल्या पोलीस सुरक्षितेत वाढ करावी, ज्या ठिकाणी वटवृक्ष आणि महिलावर्गाची रहदारी अधिक असेल अशा ठिकाणी पोलीस संरक्षणात वाढ करण्याची मागणी पाटील यांनी  केली आहे.