शहरातील अंतर्गत टोल आकारणीच्या विरोधात टोलविरोधी कृती समितीच्या वतीने बुधवारी शिरोली, शिये, शाहू, सरनोबतवाडी या टोल नाक्यांवर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सुमारे चार तासाहून अधिक काळ कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केल्याने शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन नाकाबंदी झाल्याचे दिसत होते. आंदोलकांनी मोटार, ट्रक, लक्झरी बसेस आदी वाहने टोल नाक्यांवर आणून लावल्याने राष्ट्रीय महामार्गावरून शहरात येणाऱ्या वा बाहेर पडणाऱ्या वाहनचालकांची कोंडी झाली. दीर्घकाळ आंदोलन चालूनही अनुचित प्रकार मात्र घडला नाही. महायुतीच्या वतीने आंदोलनात सवतासुभा घेऊन शहरातून दुचाकी रॅली काढली होती.   
आयआरबी कंपनीने सुरू केलेल्या टोल आकारणीच्या विरोधात सर्वपक्षीय टोलविरोधी कृतीसमितीच्या वतीने बुधवारी चक्का जाम आंदोलनाची घोषणा केली होती. आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेले नगरसेवक, वाहनधारक संघटना, वाहनधारक यांनी आपली वाहने विविध टोल नाक्यांवर आणून लावली. वाहने तेथेच पार्क करून आंदोलक निघून गेल्याने टोल नाक्यांपासून होणारी वाहतूक बंद पडली. बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांनीही शेकडो वाहने हटविणे जिकिरीचे होऊन बसले होते. शिरोली, शाहू, शिये या नाक्यांवरून अजिबात वाहतूक होऊ शकली नाही.    
आंदोलकांनी टोल नाक्यांजवळ दुपारनंतर ठिय्या आंदोलन सुरू केले. आंदोलकांसाठी आखून दिलेल्या रेषेच्या बाहेर उभे राहूनच आंदोलक घोषणा देत होते. ज्येष्ठ नेते एन.डी.पाटील यांनी टोलच्या बाबतीत आघाडी शासन घेत असलेल्या भूमिकेवर जोरदार टीका केली. राज्य शासन लोकशाही मातीत घालीत असल्याचा आरोप त्यांनी केला. शासनाची टोल आकारणीची भूमिका दिसून येत असल्याने मुख्यमंत्र्यांबरोबर होणाऱ्या चर्चेला आग लावायची काय, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवरही प्रहार चढविला. आंदोलनात महापौर सुनीता राऊत, कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे, गोविंद पानसरे, बाबा इंदूलकर, बाबा पार्टे, दिलीप देसाई, अजित सासने आदी सहभागी झाले होते. सुमारे चार तास आंदोलक रस्त्यावर बसून राहिले होते. पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी नगरसेवकांना गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिल्यानंतर नगरसेवक तेथून पांगले.     
शाहू टोल नाका येथे झालेल्या आंदोलनात उद्योजकांचा समावेश होता. कागल टोल विरोधी कृती समिती व गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (गोशिमा) यांच्यावतीने रस्त्याच्या दुतर्फा ठिय्याआंदोलन करण्यात आले. गोशिमाचे अध्यक्ष उदय दुधाणे, चंद्रकांत जाधव, भालचंद्र कुलकर्णी, कागल कृती समितीचे भैय्या माने, नाविद मुश्रीफ, युवराज पाटील आदी सहभागी झाले होते.
सतेज समर्थक आंदोलकांत महाडिक
कोल्हापूर-शिरोली या मार्गावरून आमदार महादेवराव महाडिक हे जात असतांना चक्काजाम आंदोलनामुळे त्यांचे वाहन रोखून धरण्यात आले. त्यावर महाडिक यांनी कोणते आंदोलक आंदोलनात आहेत, याची विचारणा केली. त्यांचे विरोधक सतेज पाटील हे आंदोलनात असल्याचे समजल्यावर आमदार महाडिकही टोलविरोधात घोषणा देत व नृत्याचा ठेका धरीत आंदोलनात सहभागी झाले. या आंदोलनात मी उतरल्याने माझी प्रसिध्दी होईल, तुमचे साहेब बाजूला राहतील, अशी शेरेबाजीही त्यांनी केली.
केएमटीचे चार लाखांचे नुकसान
शहरात बुधवारी चक्काजाम व रास्तारोको अशी दोन प्रकारची आंदोलने झाली. यामुळे केएमटीच्या दुपारपर्यंत सुमारे ५० फेऱ्या रद्द झाल्या. विशेषत शहराच्या पूर्वेकडे जाणाऱ्या कागल, गांधीनगर, शिरोली,नागाव फाटा, रूकडी, पेठवडगाव या मार्गावरील फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. चार लाखांचा तोटा केएमटीला सहन करावा लागला. शहरातील बससेवा नियमितपणे सुरू असली तरी आंदोलनामुळे प्रवासी संख्या रोडावल्याचे दिसत होते.