गोदा उद्यानाचे भूमिपूजन करत सत्ताधारी मनसेने रिलायन्स फाऊंडेशनच्या मदतीने या प्रकल्पाचे घोडे पुढे दामटण्याचे स्पष्ट संकेत दिल्यानंतर, आता अंधारात चाचपडणाऱ्या पाटबंधारे विभागाला जाग आली आहे. गोदावरीच्या काठावर साकारणाऱ्या या प्रकल्पाच्या आराखडय़ाची संपूर्ण माहिती महापालिकेने त्वरित सादर करावी, असा खलिता या विभागाने
धाडला आहे. नदीपात्र वा पूररेषेत करावयाच्या कोणत्याही कामात पाटबंधारे विभागाकडून ‘ना हरकत दाखला’ मिळविणे क्रमप्राप्त ठरते. परंतु, गोदा उद्यान प्रकल्पासाठी आजवर महापालिकेने त्या स्वरूपाचा कोणताही दाखला घेतलेला नाही. असे असताना या प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांचे काम कोणतीही पूर्वकल्पना न देता सुरू करण्यात
आले. त्यास आक्षेप नोंदवत या प्रकल्पाची संपूर्ण माहिती सादर करण्याचे पत्राद्वारे सूचित करण्यात आले आहे.
वेगवेगळ्या कारणास्तव जवळपास दहा वर्षे रेंगाळलेल्या गोदा उद्यानाचा नूतनीकरण भूमिपूजन सोहळा शनिवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला. राष्ट्रवादी व आप यांसारखे काही पक्ष या प्रकल्पास विरोध करत असले, तरी त्यामागे लोकसभा निवडणूक हे एक कारण आहे. आचारसंहिता लागू होण्याआधी भूमिपूजन करताना मनसेनेही निवडणुकीचे समीकरण ठेवले. राजकीय पटलावर वाद-विवादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या प्रकल्पाबद्दल हा भूमिपूजन सोहळा होईपर्यंत खुद्द पाटबंधारे विभाग अनभिज्ञ राहिला. सांस्कृतिक, पर्यावरण अनुकूल, कला आणि क्रीडा या चार संकल्पनांवर आधारित गोदा उद्यान प्रथम पालिकेच्या ताब्यात असणाऱ्या जागेत साकारण्याचे प्रयोजन आहे. त्याचे भूमिपूजन करताना ‘गोदा उद्यान नूतनीकरण भूमिपूजन’ असे नाव जाणीवपूर्वक दिले गेले. त्याद्वारे अस्तित्वातील प्रकल्पाचे नूतनीकरण केले जात असल्याचे दर्शविले जात आहे. राज ठाकरे यांच्या स्वप्नातील रखडलेला हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत पूर्णत्वास नेण्याचा चंग एकिकडे सत्ताधारी मनसेने बांधला असताना, दुसरीकडे त्यातील अडथळ्यांच्या शर्यतीचा श्रीगणेशा पाटबंधारे विभागाने केला आहे.
गोदा उद्यान प्रकल्पाचे सादरीकरण झाल्यानंतर या प्रकल्पासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या रिलायन्स फाऊंडेशन मिळविणार असल्याचे महापालिकेने म्हटले होते. परंतु, भूमिपूजन सोहळा होईपर्यंत ना महापालिकेने त्या अनुषंगाने काही कार्यवाही केली, ना रिलायन्स फाऊंडेशनने. आजवर उभयतांनी या संदर्भात कोणताही संपर्क साधला नसल्याचे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील बाफना यांनी सांगितले. गोदा उद्यानाविषयी सध्या केवळ प्रसारमाध्यमांतून माहिती मिळते. नुकतेच त्याचे भूमिपूजनही करण्यात आले. या पाश्र्वभूमीवर, पाटबंधारे विभागाने गोदा उद्यान प्रकल्पाचा आराखडा सादर करावा, असे पत्राद्वारे महापालिकेला सूचित केले आहे. हा आराखडा प्राप्त झाल्यानंतर त्याचा अभ्यास केला जाईल. नदीकाठावर कोणतेही बांधकाम करावयाचे असल्यास ‘ना हरकत दाखला’ आधी प्राप्त करावा लागतो. गोदा उद्यानासाठीही ही मान्यता मिळविणे बंधनकारक आहे. नदीपात्राच्या संरक्षणाला महत्तम प्राधान्य आहे. प्रकल्पामुळे नदीच्या प्रवाहात काही अडथळे येतील काय, याची शहानिशा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे बाफना यांनी नमूद केले.