मागील लोकसभा निवडणुकीत आघाडीचे उमेदवार संजीव नाईक यांना ३३ हजारांचे मतधिक्य देणारी नवी मुंबई या वेळी नाईकांना तारणार की मारणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. पालकमंत्री गणेश नाईक यांची कर्मभूमी असलेल्या नवी मुंबईवर संजीव नाईक यांची सर्व मदार असून भाईंदरमध्ये मताधिक्य मिळाल्यास नाईकांना बोनस ठरणार आहे. राजकीय पटलावर नवी मुंबई हा पालकमंत्री गणेश नाईक यांचा बालेकिल्ला मानला जातो. गेली १९ वर्षे या शहरावर त्यांची सत्ता आहे. त्यामुळे पालिकेत ५९ नगरसेवकांच्या रूपात निर्विवाद बहुमत असून २००९ रोजी नव्याने तयार झालेल्या दोन विधानसभा मतदारसंघावरदेखील या कुंटुबीयाने आपले वर्चस्व काय ठेवले आहे. पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील विकासावर मते मागितली तर नाईक यांनीही नवी मुंबईचा विकास हाच मुद्दा गेल्या तीन निवडणुकांत कायम ठेवला आहे. ठाण्यात महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांना मिळणारे मताधिक्य नवी मुंबई व मीरा भाईंदर येथील तीन विधानसभा मतदारसंघ रोखून ठेवतील असे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघ हा तसा पूर्वीच्या जनसंघाचा व नंतर शिवसेनेचा मानला गेला होता. मागील निवडणुकीत नाईक यांनी तो शिवसेनेकडून खेचून घेतला. ठाणे शहरातून नाईकांना मताधिक्याची अपेक्षा नाही पण तेथील विचारे यांना मिळणारे मताधिक्य चिंता आहे. मागील निवडणुकीत नवी मुंबई मीरा-भाईंदर या दोन शहरांमधून मिळणाऱ्या ४९ हजारांच्या मतांवर नाईक विजयी झाले होते. ठाण्यात होणारे राष्ट्रवादीविरोधी मतदान रोखण्यात मनसेचे राजन राजे यशस्वी झाल्याने संजीव नाईक यांचा विजय सुकर झाला होता हे जगजाहीर आहे. या वेळी हा फॅक्टर कामी येण्याची शक्यता कमी वर्तवली जात आहे. ठाण्यात राष्ट्रवादीचे वसंत डावखरे, नजीब मुल्ला व काँग्रेसच्या रवींद्र फाटक यांनी त्यांच्या विधानसभा निवडणुकीची तयारी करताना नाईक यांच्यासाठी काम केल्याची चर्चा आहे. त्यामुळे ठाण्यातील या तीन नेत्यांनी केलेला प्रचार, नवी मुंबईत मिळणारे मताधिक्य, संजीव नाईक यांचा दांडगा वैयक्तिक जनसंर्पक, नाईक कुटुंबीयांची सढळ हस्ते होणारी अर्थिक मदत, निवडणुकीत केलेला अमाप खर्च, या जोरावर नाईक पाच ते दहा हजार मतांनी निवडून येतील असा अंदाज मांडला जात आहे. याउलट देशात पसरलेली मोदी लाट, नाईकांविषयी स्वपक्षात तसेच मित्रपक्षात असणारी नाराजी, भाईंदरमध्ये आमदार मुझफ्पर हुसेन यांनी न केलेली मदत, या वेळी कमजोर पडलेला मनसे फॅक्टर, नवी मुंबईत ग्रामस्थांनी क्लस्टर वरून घेतलेली विरोधी भूमिका, सत्ताधाराविषयी असलेली चीढ, वाढलेले मतदान, तरुणाईचा बदलाकडे असलेला कल यामुळे नाईक पराजित होतील असे म्हटले जात आहे. या सर्व चर्चाना शुक्रवारी दुपापर्यंत पूर्णविराम मिळणार आहे.