बोरिवलीच्या गोराई गावातील समुद्रकिनाऱ्यावर कचऱ्याचे आणि घाणीचे साम्राज्य पसरले असून हा समुद्रकिनारा की गटारकिनारा असा प्रश्न पडावा इतकी या किनाऱ्याची दुरवस्था झाली आहे. हा समुद्रकिनारा जवळपास आठ ते दहा किलोमीटर पसरलेला आहे. परंतु, गेली कित्येक वर्षे या समुद्रकिनाऱ्याची साधी साफसफाईही करण्यात आलेली नाही. त्यामुळे, या परिसरात येणाऱ्या पर्यटकांना नाक मुठीत धरावे लागत आहे.
या किनाऱ्यावर एकाही लहानमोठय़ा दिवाबत्तीची सोय नाही. त्यामुळे, येथे बलात्काराच्या तसेच खुनासारख्या गंभीर घटनाही घडल्या आहेत. गोराईच्या समुद्रकिनाऱ्यावर देशी-परदेशी पर्यटक फिरण्यासाठी येतात. परंतु, त्यांना बसण्यासाठी साधी बाकांचीही सोय येथे नाही. समुद्रकिनाऱ्यावर तर गेल्या कित्येक साफसफाई करण्यात आलेली नाही, अशी तक्रार येथील नगरसेवक शिवा शेट्टी यांनी केली आहे. शेट्टी यांनी समुद्रकिनाऱ्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्याकरिता मुंबई महानगरपालिकेला पत्रही लिहिले आहे.
गोराई समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षारक्षक आहेत, पण त्यांची संख्या पुरेशी नाही. या शिवाय लाईफ जॅकेट, टॉर्च, हेल्मेट, मेगाफोन, रश्शी व टायर टय़ूब आदी सुरक्षेसंदर्भातील कुठलेही साहित्य नाही. या वस्तू ठेवण्यासाठी एखाद्या खोलीची सोयही समुद्रकिनाऱ्यावर करण्यात आलेली नाही.
समुद्रकिनाऱ्यावर देखरेख ठेवण्यासाठी असलेल्या ‘वॉच टॉवर’ची सोयही येथे नाही. नाही म्हणायला गेल्या वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेतर्फे सुरक्षारक्षक आणि अग्निशमन दलातर्फे सुरक्षारक्षकांची सोय करण्यात आली. पण, त्यांना कपडे बदलण्यासाठी खोलीची किंवा स्वच्छतागृहांची सोय नाही. आपल्याच कर्मचाऱ्यांची सोय पालिकेने केलेली नाही. त्यामुळे, पर्यटकांसाठी स्वच्छतागृहे असण्याचा प्रश्नच येत नाही