सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ आणि रुग्णालयाला बी.एस.सी. इन्टरनॅशनल सर्टिफिकेशन्स प्रा.लि.द्वारे दर्जेदार व्यवस्थापन यंत्रणेकरिता आयएसओ ९००१: २००८ मानांकन प्रदान करण्यात आले आहे.
बी.एस.सी.आय.सी.द्वारे दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय आणि रुग्णालयातील मध्यवर्ती प्रयोगशाळांना गुणवत्तापूर्ण नियोजनासोबतच दर्जेदार वैद्यकीय शिक्षण, शैक्षणिक सुविधा, संशोधनपुरक सुविधा, रोगनिदान यंत्रणा, विविध प्रकारच्या विशेष व अद्यावत आरोग्यसेवा, याकरिता आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयएसओ मानांकन प्रमाणपत्र देण्यात आले. बी.एस.सी.आय.सी.चे विभागीय प्रतिनिधी मनीष वाट यांनी विद्यापीठाचे मुख्य सल्लागार डॉ.वेदप्रकाश मिश्रा व कुलगुरू डॉ. दिलीप गोडे यांना हे प्रमाणपत्र प्रदान केले.
यावेळी विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य सागर मेघे, मुख्य समन्वयक डॉ. एस.एस.पटेल, कुलसचिव डॉ. राजीव बोरले, वैद्यक शाखेचे अधिष्ठाता डॉ. संदीप श्रीवास्तव, संचालक डॉ. ललीत वाघमारे, विशेष कार्य अधिकारी अभ्युदय मेघे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर.सी.गोयल, डॉ. प्रकाश बेहरे आदी उपस्थित होते.
आयएसओ मानांकनामुळे या विद्यापीठाचीच नव्हे, तर सावंगी रुग्णालयाचीही प्रतिमा अधिक उज्ज्वल झाली असून सामाजिक जबाबदारीही वाढली आहे.
उच्च शिक्षण आणि अद्यावत आरोग्यसेवेच्या गुणवत्तेबाबत कुलपती खासदार दत्ता मेघे आणि संस्थेच्या व्यवस्थापनाने स्वीकारलेल्या प्रागतिक धोरणांमुळे हे मानांकन प्राप्त झाले आहे, अशी भावना डॉ. मिश्रा यांनी यावेळी व्यक्त केली.