सोलापूरच्या भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक कार्यालयास आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचे आयएसओ-९००१-२००८ हे मानांकन प्रमाणपत्र नुकतेच मिळाले आहे. कार्यालयीन कामकाजाचा निपटारा जलदगतीने व मुदतीत होऊन त्याचा लाभ सामान्य नागरिकांना मिळण्याच्यादृष्टीने या आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानांकन प्रमाणपत्राचा निश्चितपणे उपयोग होईल व त्या माध्यमातून सामान्यजनात भूमी अभिलेख विभागाची प्रतिमा उजळण्यास मदत होणार असल्याचा विश्वास या विभागाचे जिल्हा अधीक्षक बाळासाहेब वानखेडे यांनी व्यक्त केला.
न्यूझीलंडच्या अॅब्सोल्युट क्लालिटी सर्टिफिकेशन प्रा. लि. या कंपनीमार्फत सोलापूर जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक कार्यालयास हे आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानांकन प्रमाणपत्र मिळाले आहे. हे प्रमाणपत्र राज्याचे जमाबंदी आयुक्त चंद्रकांत दळवी व भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक अप्पासाहेब गिरमकर यांच्या उपस्थितीत सोलापूरचे भूमी अभिलेख अधीक्षक बाळासाहेब वानखेडे यांना प्रदान करण्यात आले. या वेळी चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते वानखेडे यांचा सत्कारही करण्यात आला. आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानांकन प्रमाणपत्र मिळविणारे सोलापूर जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक कार्यालय हे राज्यात पहिले ठरले आहे.
या वेळी बोलताना दळवी यांनी, आंतरराष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र मिळविणाऱ्या सोलापूर जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक कार्यालयाचा आदर्श राज्यातील भूमी अभिलेख विभागाच्या इतर जिल्हा कार्यालयांनीही घ्यावा व भूमी अभिलेख विभागाचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.