बँक खात्यातून परस्पर पैसे काढून घेण्याचे प्रकार वरचेवर वाढत चालले आहेत. कार्ड न वापरताही अशा प्रकारे बेमालूम पैसे उकळण्यात येत असल्याने खातेदार गडबडून जात आहेत. शहराच्या जडवाडारस्ता भागातील तरुणाच्या बँक खात्यातून अशा प्रकारे १६ हजार ३८० रुपये काढून घेण्यात आले. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शेख सिराज शेख गफूर (वय ३३) यांची फसवणूक करण्यात आली. त्यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गेल्या १९ नोव्हेंबरला रात्री सव्वानऊच्या सुमारास शेख यांच्या आयडीबीआय बँकेत असलेल्या खात्यातून कोणी तरी संगणकावरील व्हीपीएस पत्त्याचा आधार घेत फिर्यादीचे कार्ड न वापरता, तसेच संमती न घेता परस्पर हे पैसे काढून घेतल्याचा प्रकार उजेडात आला. या प्रकारामुळे बँक खात्यातील पैसे कोणीही कसेही तंत्र वापरून अलगद काढून घेऊ शकतो का, या चर्चेने पुन्हा जोर पकडला आहे. या प्रकारामुळे पोलीसही चक्रावून जात आहेत.