टीव्ही आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांत अभिव्यक्ती असली, तरी जबाबदारीची जाणीवही आहे. टीव्ही घराघरांत दिसत असल्याने या माध्यमात काम करत असताना ही जाणीव जास्तच असायला हवी.. सांगताहेत सतीश राजवाडे!
‘मुंबई पुणे मुंबई’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या प्रेमकथांनंतर तू पुन्हा एकदा ‘प्रेमाची गोष्ट’च घेऊन येत आहेस. या तीनही गोष्टींमध्ये काय फरक जाणवला?
–  ‘मुंबई पुणे मुंबई’ हा एका ठरावीक वयातल्या लोकांचा चित्रपट होता. पण हा नवीन चित्रपट एका वेगळ्याच वयोगटातल्या प्रेमाबद्दल बोलतो. हा वयोगट थोडासा प्रगल्भ आहे. त्यामुळे ही ‘प्रेमाची गोष्ट’ प्रगल्भ गोष्ट आहे. मुळात प्रेम ही खूप साधी, सरळ आणि सोपी गोष्ट आहे, पण आपण तिला खूपच कठीण आणि गुंतागुंतीची बनवत असतो. प्रेमात अपेक्षा वाढल्या की, मग अपेक्षाभंगही नाइलाजाने होतोच. या सगळ्याबाबत माझा चित्रपट बोलतो.
० ‘प्रेमाच्या गोष्टी’तली पात्रं निवडलीस कशी?
– ही प्रगल्भ प्रेमाची गोष्ट असल्याने मला तसाच चेहरा हवा होता. गोष्ट लिहून झाल्यानंतर अतुल कुलकर्णी यांना पाठवली होती. त्यांना ती गोष्ट आवडली. प्रेम करायला मन संवेदनशील असावं लागतं. अतुल स्वत: एक संवेदनशील माणूस आणि कलाकार आहेत.  पण हसतानाही ते खूप छान दिसतात. त्यामुळे ही गोष्ट त्यांनी खूपच चांगल्या पद्धतीने साकारली आहे.
आणि सागरिका घाडगेची निवड?
– अतुल कुलकर्णीसमोर मला एक ताजा चेहरा हवा होता. आमच्या निर्मात्यांनीच मला सागरिकाचं नाव सुचवलं. मुळात ती यशराज कॅम्पची अभिनेत्री आहे. त्यामुळे ती आमची गोष्ट करेल की नाही, इथपासून तयारी होती, पण आम्ही नकार गृहीत धरूनच तिला स्क्रिप्ट पाठवलं. तिला ते आवडलं, पण तिने एक अट घातली होती की, डबिंग ती स्वत:च करणार. त्यासाठी तिने दीड महिना मराठीचा अभ्यास केला. ती मराठी असली, तरी ती संपूर्णपणे वेगळ्या वातावरणात वाढली आहे, पण तिने कसून सराव केला होता. एक एक वाक्य तिने शंभर वेळा घोटून घेतलं आणि मगच डबिंग पूर्ण केलं. ती राजघराण्यातली आहे, यशराज फिल्म्सची अभिनेत्री आहे, या सगळ्यापेक्षा ती खूप मेहनती आणि समजूतदार आहे ही गोष्ट महत्त्वाची आहे.
तू चित्रपट, नाटक आणि मालिका या तीनही प्रकारांत काम केलं आहेस. तुला भावणारं माध्यम कोणतं आणि का? किंवा चित्रपट व मालिका या दोन्ही माध्यमांतील अभिव्यक्ती स्वातंत्र्यात फरक पडतो का?
– या दोन्ही माध्यमांमधून व्यक्त होता येतं. अभिव्यक्ती दोन्हीकडे आहे, पण त्याचा फॉरमॅट वेगळा आहे. मुख्य म्हणजे मनोरंजन ही जबाबदारीची जाणीव आहे, ही गोष्ट मालिकेत अद्याप खूपच कमी लोकांच्या लक्षात आली आहे. माध्यमाची जबाबदारी कळत नसेल, तर त्यापेक्षा मोठी चूक नाही. चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपटगृहापर्यंत यावं लागतं. तिथे तुम्हाला न पाहण्याचा पर्याय असतो, पण टीव्ही हा घरात पोहोचलेला सदस्य आहे. घरातल्या मुलांनी काय पाहायचं, ही निवड पालक व मुलांकडे नाही. टीव्हीवर जे काही दाखवलं जाईल, ते पाहिलं जातं. आपण टीआरपीमुळे काय देतोय, यापेक्षा काय दाखवल्यावर टीआरपी मिळेल, हा विचार त्या माध्यमात खूप होताना दिसतो; पण मग माझ्या मुलीबरोबर पाहताना मला लाज वाटेल, असा कार्यक्रम एक कलाकार म्हणून तरी मी करणार नाही. मालिकेची भाषा, आपण पात्रांकडून काय करून घेतोय, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, तर ती जबाबदारी आहे.
कॅमेरा ही चित्रपटाची भाषा असताना, ‘मराठी भाषेतला चित्रपट आहे, त्याला मर्यादित मार्केट आहे’ वगैरे भाषा कशी होते?
– मुळात चित्रपट हा मराठी भाषेतला आहे, हे धरून चालणारे दिग्दर्शक व निर्माते यांचा बुद्धय़ांक नक्कीच कमी असतो. चित्रपटाची भाषा ही सगळ्या जगभर सारखीच असते. तुम्ही ती किती प्रभावीपणे वापरता, यावर तुमच्या चित्रपटाचं यश अवलंबून आहे, पण हे न समजणाऱ्यांमुळे मराठी चित्रपट गरीब राहिला आहे. माझं स्पष्ट मत आहे. चित्रपटात हेलिकॉप्टरची गरज नसेल, तर वापरू नका,पण हेलिकॉप्टरची गरज असेलच, तर मात्र केवळ बाइक देऊन दिग्दर्शकाची बोळवण करू नका. प्रेक्षकांनी दीडशे रुपये खर्च करून मराठी चित्रपट का बघावेत, याचं कारण त्यांना द्यायला नको का? एकाच रकमेच्या तिकिटात प्रेक्षकांना सलमानचा अतिशय झगमगीत चित्रपट पाहायला मिळत असेल, तर प्रेक्षक गरीब बापुडय़ा मराठी चित्रपटाकडे का फिरकतील?
पण मग या सर्वात मराठी अभिनेत्यांना नसलेल्या स्टार व्हॅल्यूचा प्रश्न येतो का? ही स्टार व्हॅल्यू मराठीत का निर्माण होऊ शकली नाही?
– याला कारण आपण, या इंडस्ट्रीतले लोकच आहोत.  आपल्याकडच्या अभिनेत्यांना ‘फॅन फॉलोईंग’ नाही. मग निर्माता तरी पैसे टाकायला कसा तयार होईल. मराठी चित्रपटसृष्टीला आता चरित्र नायकांपेक्षा स्टारची जास्त गरज आहे. आपल्याकडे आशय, हुशारी, तंत्रज्ञान या सगळ्या गोष्टी आहेत, पण आपले अभिनेते आपल्या जीवनशैलीची काळजी घेत नाहीत. ते लोकांसमोर स्वत:ला उत्तम प्रकारे सादर करत नाहीत.  चित्रपट हे माध्यम ग्लॅमरचं आहे. रोजच्या त्रासातून तीन तास तरी मोकळीक मिळावी म्हणून प्रेक्षक तिकीट काढून अंधाऱ्या चित्रपटगृहात येतात. त्यांच्या स्वप्नातील चकचकीत जग दिसण्याऐवजी त्यांना त्रासच होणार असेल, तर ते तरी का येतील ना?
मग जागतिक चित्रपटाची व्याख्या काय? मराठी चित्रपट जागतिक स्तरावर पोहोचेल का?
– माझ्या मते आपला ‘श्वास’ ऑस्करला गेला, त्याच वेळी मराठी चित्रपट जागतिक स्तरावर पोहोचला होता. त्यानंतर आलेल्या ‘नटरंग’, ‘जोगवा’, ‘देऊळ’ अशा काही चित्रपटांनी खूपच चांगले दिवस दाखवले. जागतिक चित्रपटाची व्याख्या खूप साधी आहे. त्यात विषय वरचढ असतो, विषयाची हाताळणी साधी सरळ असते. तो चित्रपट कोणत्याही प्रांताच्या, भाषेच्या आणि संस्कृतीच्या मर्यादा ओलांडूनही दुसऱ्याला समजू शकतो.
प्रसिद्धी आणि जाहिरात यात मराठी चित्रपट मागे पडतो, असं वाटतं का?
– मी तर म्हणेन की, मराठी चित्रपट प्रसिद्धी आणि जाहिरात याच दोन गोष्टींमध्ये मागे पडतो. आपल्या लोकांना प्रसिद्धीचं महत्त्वच कळत नाही. प्रसिद्धीसाठी योग्य बजेट नसेल, तर निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकानेही चित्रपट धंद्यात उतरूच नये. आपला चित्रपट आपणच लोकांपर्यंत पोहोचवला नाही, तर तो आपोआप पोहोचणारच नाही. मराठी चित्रपट तोंडी प्रसिद्धीवर चालतात, हे समीकरण कुठे तरी बदलायला हवं. लोक चित्रपटगृहांत येत नसतील, तर चित्रपट लोकांपर्यंत पोहोचायला हवा.
यात डिजिटल रिलिज वगैरे उपाय मदतीचे ठरू शकतील का?
– नक्कीच ठरतील, पण डिजिटल रिलिजचा फायदा केवळ धंद्यासाठी होईल. प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत आणण्यासाठी डिजिटल रिलिज काहीच मदत करू शकत नाहीत, पण त्यामुळे मराठी चित्रपटांना बरे दिवस येतील, एवढं नक्की.
मराठी चित्रपटांना स्क्रीन्स मिळत नाहीत, अशी बरीच ओरड गेल्या वर्षी झाली होती. त्याबद्दल काय सांगशील?
– स्क्रीन्स मिळत नाहीत, हा मुद्दाच मला पटत नाही. हिंदीतल्या एखाद्या बडय़ा कलाकाराचा चित्रपट प्रदर्शित होत असेल, तर हिंदीतले इतर अनेक बडे कलाकारही आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलतात. हा कमीपणाचा किंवा मानाचा मुद्दा करण्याची गरजच नाही. त्यासाठी धंदा करण्याची बुद्धी असावी लागते. ती नसेल, तर मग अशा प्रकारचा कांगावा करावा लागतो.
मग चित्रपट हा पूर्णपणे धंदा आहे का? त्याच्यावर कला वगैरेचे साज उगाच चढवले
जातात का?
– ती कला नक्कीच आहे, पण जेव्हा तुमच्या कलेवर तुमचं पोट अवलंबून असतं, त्या वेळी तो नक्कीच धंदा होतो.  कलेसाठी कला म्हणून तुम्ही एखादी गोष्ट करता, त्या वेळी ‘यातून मला किती पैसे सुटतील’, हा विचार कोणीच करत नाही, पण आज या क्षेत्रात अमिताभ बच्चनपासून सतीश राजवाडेपर्यंत सगळेच जण आपला मोबदला वाजवून घेतात. मग कलेच्या गप्पा कशाला करायच्या! हां, आता कोणी धर्मादाय उघडूनच काम करत असेल, तर ती व्यक्ती खरंच ग्रेट आहे, पण माझ्या ऐकिवात तरी असं कोणीच नाही. साधारणपणे एका विशिष्ट टप्प्यावर एखादा कलाकार ठरवू शकतो की, मी माझं मानधन घेणार नाही आणि केवळ आवड म्हणून ही गोष्ट करेन.
‘प्रेमाची गोष्ट’नंतर पुढे काय?
– गेले काही महिने नवीन स्क्रिप्ट्स वाचतोय. बऱ्याच निर्मात्यांनी स्क्रिप्ट्स पाठवल्या आहेत, पण सध्या तरी एकही स्क्रिप्ट मनासारखी मिळालेली नाही. ती मिळाली की, लगेचच काम चालू करणार.