जुन्या आणि नव्या ज्ञानाचा मेळ साधून संशोधनात आमूलाग्र क्रांती घडविणारी नवी पिढी घडविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.
येथील लोकमान्य टिळक स्मारक संस्थेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन डॉ. काकोडकर यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार मकरंद पाटील, नगराध्यक्ष निलीमाताई खरात उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दीपक टिळक होते.
महाराष्ट्र ही रत्नांची खाण आहे. अनेक भारतरत्न राज्याने भारताला दिले. मराठी माणसाला जगाचे संदर्भ उपलब्ध करून देण्याचं कामही विश्वकोशाच्या माध्यमातून येथे होते, असे सांगून डॉ. काकोडकर म्हणाले,की ज्ञानाची निर्मिती संवर्धन आणि विस्तार ही सतत चालू राहणारी गोष्ट आहे. भारतीय संस्कृतीने जगाला ज्ञानाचा स्पर्श होण्याआधीपासून ज्ञानसंवर्धनाचं काम केलं आहे. आपल्याकडे असलेले अत्युच्च ज्ञान समजून घेण्यातलं सातत्य आपण राखू शकलो नाही. त्यामुळेच आपलं आधीचं ज्ञान लुप्त झालं, म्हणून आपण आता नव्यानं ज्ञानाच्या मागे लागलो आहोत.
डॉ. काकोडकर पुढे म्हणाले, मला संस्कृत येत नाही. त्यामुळे वेदवाङ्मयात प्राचीन संस्कृतीने जे ज्ञानाचे भांडार भरून ठेवले आहे त्याचा उपयोग मला घेता येत नाही.
पाश्चात्त्यांच्या संशोधनापूर्वी गणित व शास्त्रासह अनेक पायाभूत क्षेत्रात भारतीयांनी संशोधन उपलब्ध करून ठेवले आहे. हे संशोधन जगाच्या भवितव्यासाठी फार महत्त्वाचे आहे. हे जुनं ज्ञान शोधणारे विद्वान नव्याने तयार करावे लागतील.
जग आकडय़ाच्या घडामोडीत असताना आपण १०८ या आकडय़ाला महत्त्व देतो. सूर्य हा पृथ्वीच्या १०८ पटीने मोठा आहे, तर चंद्र पृथ्वीतले अंतर १०८ पटीने जास्त आहे. ज्यावेळी सूर्य प्रकाशाची गती मोजण्याची साधने नव्हती त्यावेळी अधोरेखित केलेल्या निष्कर्षांत पोहचताना आजही आपण चक्रावून जातो. म्हणून जुनी निरीक्षणे, नोंदी, निष्कर्ष याचाही अभ्यास होणे गरजेचे आहे, जे लुप्त झाले आहे. ते हुडकून काढावं लागेल. मी जरी आधुनिक ज्ञानाचा पुरस्कर्ता असलो तरीही आज जुन्या ज्ञानाचा उपयोग करून नवीन निष्कर्ष शोधावे लागतील. म्हणून मी म्हणतो, जुन्या-नव्या ज्ञानाच्या संशोधनाचा मेळ साधणारी नवी पिढी घडविण्याची गरज आहे. त्यामुळे आपण जगापुढे नवे मापदंड, आदर्श आणि संशोधने ठेवू शकू. त्यातून संशोधनात आमूलाग्र क्रांती आणता येईल, असा विश्वासही डॉ. काकोडकर यांनी व्यक्त केला.
या वेळी आ. मकरंद पाटील यांनी, लोकमान्य टिळक संस्थेने समाजाला दिशा देण्याचं काम केलं. २१ व्या शतकाला अभिप्रेत असणारं वाचनालय आता सुरू झाल्यामुळे टिळकांच्या विचारांचे नव्याने पुनरुज्जीवन होईल असे सांगितले. नगराध्यक्षा निलीमाताई खरात यांचे भाषण झाले. अनिल जोशी यांनी प्रास्ताविक केले. स. रा. फडणीस यांनी ओळख करून दिली. डॉ. शरद अभ्यंकर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. संस्थेला देणगी देणाऱ्यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात दीपक टिळक म्हणाले,की लोकमान्य टिळकांचे विचार, नीतिमूल्ये जपण्याचे काम टिळक स्मारक संस्थेने केले. लोकांना सर्व विषयांचं सखोल ज्ञान असले पाहिजे हे त्यांना अभिप्रेत होतं. राष्ट्रीय शिक्षण आणि आधुनिक संस्कृती, भाषा, शास्त्र याने देश घडवायचा आहे. त्यासाठी वाचनालये ही गरज आहे.
वसंतराव बोपर्डीकर, प्रज्ञा कुलकर्णी, मेधा साळवेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला सातारा जिल्ह्य़ातील अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.