राज्यात कामगार कायद्याच्या अंमलबजावणी प्रश्नावर आणि कर्मचारी वर्गाला स्वाभिमानाने जगण्याच्या विषयावर विधानसभेत संघर्ष करण्यात येईल, अशी ग्वाही माकपचे आमदार जे. पी. गावित यांनी दिली. केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर जागतिकीकरण व भांडवलदारधार्जिण्या आर्थिक धोरणावर भर देण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
महाराष्ट्र सेल्स व वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेच्या स्थानिक शाखेतफे शालिमार येथील आयएमए सभागृहात आ. गावित यांचा सत्कार सुमारे २०० वैद्यकीय प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्य सचिव मुकुंद रानडे होते. शाखा सचिव मच्छिंद्र बोरसे, राज्य समिती सदस्य विकास दिवे, हर्षल नाईक, कार्यकारी सदस्या संगीता पाटील आदींनी स्वागत केले. अखिल भारतीय किसान सभेचे नेते किसन गुजर यांनी आ. गावित हे कष्टकरी जनतेचे प्रश्न विधानसभेत उपस्थित करून न्यायासाठी चळवळ पुढे नेतील, असा विश्वास व्यक्त केला. कॉ. नरेंद्र मालुसरे यांच्या प्रतिमेला प्रा. जयप्रकाश म्हात्रे, कॉ. सुनील मालुसरे, कॉ. संजय मालुसरे आदींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. कॉ. अनुराधा मालुसरे यांच्या हस्ते गावित यांचा सत्कार करण्यात आला.
गावित यांनी वैद्यकीय प्रतिनिधींनी आरोग्याच्या प्रश्नावर व कामगारांच्या हितासंबंधी सुरू ठेवलेल्या आंदोलनाबाबत समाधान व्यक्त केले. राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रश्नावरही सतर्कपणे भूमिका घ्यावी लागेल, असे त्यांनी नमूद केले. त्यानंतर गावित यांच्या हस्ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कविता राऊत, अंजना ठमके, किसन तडवी, दुर्गा देवरे, दत्ता बोरसे, सुरेश वाघ, कांतीलाल कुंभार, योगिता गवळी, कोजागिरी बच्छाव या खेळाडूंसह प्रशिक्षक विजेंद्रसिंग, काळेसर यांना गौरविण्यात आले.