नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी सत्ताधारी काँग्रेसच्या जावेद जहागीरदार यांची गुरुवारी बहुमताने निवड झाली. त्यासाठी झालेल्या निवडणुकीत जहागीरदार यांना १८, तर भाजपच्या ज्ञानेश्वर कर्पे यांना ६ मते मिळाली. पालिकेच्या कारभारात वारंवार पक्षविरोधी भूमिका घेऊनही जहागीरदार यांनाच पक्षनेतृत्वाने पुन्हा संधी दिल्याने पालिका वर्तुळासह शहरात आश्चर्य व्यक्त केले जाते.
सर्वाना संधी मिळावी यासाठी दरवर्षी उपनगराध्यक्ष निवडीची इथली परंपरा आहे. मावळते उपनगराध्यक्ष विवेक कासार यांचा वर्षांचा कार्यकाल संपल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. नवीन निवडीसाठी आज पालिकेची विशेष सभा बोलावण्यात आली होती. मतमोजणीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी निवडीची घोषणा केली.
दरम्यान, जहागीरदार यांना चौथ्यांदा उपनगराध्यक्षपदी संधी मिळाली आहे. गेल्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर दोन वर्षांत त्यांनी अनेकदा विरोधकांच्या सुरात सूर मिळवला होता. अर्थात, अनेकदा त्यांची भूमिका काँग्रेसविरोधी असली तरी जनहितासाठी होती असे सामोरे यायचे. त्यांचे हे दबावाचे राजकारण यशस्वी झाल्याने पदाची लालसा बाळगणाऱ्या होयबांचा भ्रमनिरास झाला आहे.