कोळवाडे येथील जयिहद आश्रमशाळा राज्यातील एक अग्रगण्य आश्रमशाळा आहे. सर्वच बाबतीत आश्रमशाळेने आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. आता राज्यातल्या इतर आश्रमशाळांसाठी या शाळेने रोल मॉडेल म्हणून काम करावे, अशी सूचना राज्याच्या आदिवासी विभागाचे आयुक्त संभाजीराव सरकुंडे यांनी केली.
जयिहद आश्रमशाळेच्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कोळवाडे येथे ते बोलत होते. मथुराबाई थोरात सेवाभावी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. हर्षल तांबे, आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त सीताराम कापसे, फादर रॉबर्ट डिकोस्टा, आदिवासी सेवक बाबा खरात, सरपंच श्रीमती गोधे, मुख्याध्यापक दशरथ वर्पे या वेळी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना सरकुंडे म्हणाले, या आश्रमशाळेचा परिसर, गुणवत्ता, शिक्षकांचे सामूहिक काम, विविध स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश, संस्थाचालकांचे बारीक लक्ष आणि लोकसहभाग पाहून आपण भारावून गेलो आहोत. असे काम प्रत्येक आश्रमशाळेत झाले तर वंचित मुलांना पुढे येण्यासाठी अधिक संधी उपलब्ध होतील. जगण्याची नवी आशा आणि विचारांची दिशा विद्यार्थ्यांत निर्माण करण्याचे काम येथे होत आहे. आश्रमशाळांना स्त्री अधीक्षक , पहारेकरी नेमणे तसेच सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे अनुदानित आश्रमशाळांना वेतन देण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्याध्यापक वर्पे यांनी प्रास्ताविक केले. अविनाश दिघे व शरद बटवाल यांनी सूत्रसंचालन तर डॉ. तांबे यांनी आभार मानले.