रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांच्या जमावाने परिचारिकांसह कर्मचाऱ्यांना मारहाण करून गोंधळ घातल्याचा प्रकार ताजा असताना एकाच कक्षात उपचार घेणाऱ्या दोन कैद्यांमध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे शासकीय रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या घटनेनंतर एका कैद्याने आपली तक्रार नसल्याचा अर्ज पोलिसांत दिला. त्यामुळे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही. परंतु, या घडामोडींमुळे उपचार घेणारे इतर रुग्ण, उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची नाहक अस्वस्थता वाढली आहे.
दोन दिवसांपूर्वी या रुग्णालयातील पाच परिचारिका व दोन कर्मचारी अशा सात जणांना संतप्त जमावाने मारहाण केली होती. विषबाधा झालेल्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यास कर्मचारी जबाबदार असल्याचे सांगून जमावाने रुग्णालयात गोंधळ घातला. या मारहाणीत एक परिचारिका गंभीर जखमी झाली होती. या घटनेपाठोपाठ गुरूवारी दुपारी उपचार घेणारे अजय साटम आणि जाफर अतील जुमन अतीलखान या दोन कैद्यांमध्ये वाद झाले. त्याचे रुपांतर मारहाणीत झाले. जाफरने साटमला मारहाण केली. यावेळी दोन्ही कैद्यांनी यथेच्छ शिवीगाळ केल्यामुळे रुग्णालयात घबराटीचे वातावरण पसरले. रुग्णालयात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त नसल्याने कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती सरकारवाडा पोलीस ठाण्यात कळविली. पोलिसांनी दोन्ही कैद्यांना ताब्यात घेतले. परंतु, त्यातील साटमने आपणास कोणतीही तक्रार द्यावयाची नसल्याचे पत्र दिले, असे सरकारवाडा पोलीस ठाण्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे या प्रकरणी गुन्हा दाखल केला गेला नाही. हे दोन्ही कैदी नाशिकरोड कारागृहात शिक्षा भोगत आहेत. प्रकृती अस्वास्थतेचे कारण देऊन ते उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. एकाच कक्षात उपचार घेत असताना त्यांच्यातील वाद उफाळून आले. वास्तविक, जिल्हा रुग्णालयात संपूर्ण जिल्ह्यातून मोठय़ा संख्येने गोर गरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात. आधी जमावाने घातलेला गोंधळ आणि नंतर कैद्यांमधील वाद यामुळे उपचार घेणारे इतर रुग्ण व त्यांचे नातेवाईकही धास्तावले आहे. तशीच स्थिती रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची आहे. रुग्णालयाच्या आवारात कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारून बंदोबस्त ठेवावा, अशी रुग्णालयाची मागणी आहे. अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव प्रलंबित राहिल्याने वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसह आता इतर सर्वसामान्य रुग्णांवर भितीचे सावट पसरले आहे.