महिनाभरात दारूबंदीचा निर्णय घेऊ, असे आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी याकडे पाठ फिरवल्याचा आरोप करून संपूर्ण दारूबंदी जाहीर करावी, या मागणीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चंद्रपूर जिल्हा दारूमुक्ती अभियानाच्या वतीने २६ जानेवारी रोजी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. जोवर सरकार याबाबत निर्णय घेत नाही तोपर्यंत जेलमध्ये राहण्याचा निर्धार अभियानात सहभागी महिलांनी घेतला असल्याची माहिती अ‍ॅड.पारोमिता गोस्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चंद्रपूर जिल्हा दारूमुक्ती अभियानाच्या वतीने आता दारूबंदीसाठी शेवटचा निर्णायक लढा म्हणून जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात सहभागी महिलांनी जटपुरा गेटजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळय़ासमोर एकत्र येऊन सत्याग्रहाची शपथ घेतली. येत्या २६ जानेवारीला जेलभरो आंदोलन छेडण्यात येणार असून यात एक तर  मुख्यमंत्र्यांनी दारूबंदी जाहीर करावी किंवा बंदी करणे शक्य नाही, असे जाहीर करावे, असेही आंदोलनकर्त्यां महिलांनी यावेळी सांगितले.
गेल्या १२ डिसेंबरला महिलांनी मोर्चा काढून दारूबंदीची मागणी लावून धरली असता महिनाभरात निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले होते. आज महिना उलटला तरी आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. याचाच अर्थ, सरकार महिलांच्या या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे जोवर दारूबंदी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा अ‍ॅड.गोस्वामी यांनी दिला.

गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी विधानसभेत दारूबंदीचा निर्णय लवकरच घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यासोबतच विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, शिवाजीराव मोघे, उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक यांनीही दारूबंदीबाबत सहमती दर्शवली. विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार, बांधकाममंत्री छगन भुजबळ, जयंत पाटील, लक्ष्मणराव ढोबळे, राजेंद्र दर्डा, नितीन राऊत, हसन मुश्रीफ, मनोहर नाईक, वर्षां गायकवाड यांच्यासह अनेक मंत्र्यांची भेट घेऊन दारूबंदीची मागणी लावून धरण्यात आली होती. यावेळी सर्व मंत्र्यांनी दारूबंदीच्या बाजूने भूमिका घेतली, मात्र आता नागपूर सोडताच सर्व मंत्र्यांनी महिलांच्या आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे २६ जानेवारीला जेलभरो करण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड.गोस्वामी यांनी दिली. यावेळी दारूबंदी आंदोलनात सहभागी महिला व पुरुष हजर होते.