26 September 2020

News Flash

रखडलेल्या जालना-खामगाव महामार्गाचा पुन्हा श्रीगणेशा

यापूर्वीच्या कंत्राटदाराच्या आर्थिक विंवचना व अनास्थेपायी तब्बल चार वर्षांपासून रखडलेल्या जालना ते खामगाव महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा पुन्हा नव्याने शुभारंभ करण्यात आला आहे.

| February 8, 2014 02:37 am

यापूर्वीच्या कंत्राटदाराच्या आर्थिक विंवचना व अनास्थेपायी तब्बल चार वर्षांपासून रखडलेल्या जालना ते खामगाव महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा पुन्हा नव्याने शुभारंभ करण्यात आला आहे. या रस्ताच्या चौपदरीकरण बांधकामाचे नूतन कंत्राटदार विंध्यवासिनी मेगा स्ट्रक्चर्स यांनी हे काम हाती घेतले असून येत्या जुलैपर्यंत यातील बहुतांश काम पूर्ण होईल, असा विश्वास या कंपनीचे अध्यक्ष विजय गुप्ता यांनी शुभारंभ प्रसंगी व्यक्त केला.
साडेतीनशेहून अधिक अपघाती बळी घेणाऱ्या जालना ते खामगाव या १४५ किलोमीटर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या चार वर्षांंपासून रखडले आहे. राज्य शासनाने या मार्गाचे चौपदरीकरणाचे बांधकाम बांधा, वापरा व हस्तांतरित करा, या कार्यप्रणालीनुसार के.टी.कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले होते. मात्र, शासनाच्या अटी व शर्तीचे उल्लंघन करून कंपनीने हे काम विहीत कालावधीत पूर्ण केले नाही. त्यामुळे हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनला होता. सार्वजनिक बांधकाम खाते व प्रवासी वाहनासाठी हा रस्ता एक डोकेदुखी झाला होता. या रस्त्याचे काम पूर्ण व्हावे म्हणून कॉंग्रेस, भाजप-शिवसेना महायुती, राष्ट्रवादी, मनसे अशा सर्वच पक्षांनी आक्रमक आंदोलने केली. या रस्त्याचे प्रकरण अनेक वेळा विधिमंडळात गाजले. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने के.टी.कन्स्ट्रक्शन या बांधकाम  कंपनीवर दंडात्मक कारवाई करून त्यांचे कंत्राट रद्द केले.
त्यानंतर मुंबईच्या विंध्यवासिनी मेगा स्ट्रक्चर्स प्रा.लि. या खासगी कंपनीला बीओटी तत्वावर या रस्ता बांधकामाचे काम देण्यात आले. निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर या कंपनीने हे काम सुरू केले नव्हते. दरम्यान, खासदार प्रतापराव जाधव, आमदार पांडूरंग फुंडकर, राहुल बोंद्रे, दिलीप सानंदा, डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी राज्य शासन व बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. हा पाठपुरावा व आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता राज्य शासनाने विंध्यवासिनी कंपनीला हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कंपनीने या कामास आता प्रारंभ केला आहे. या कामाचा पुनश्च श्रीगणेशा कंपनीचे अध्यक्ष विजय गुप्ता यांनी नारळ फोडून देऊळगावराजा येथे केला. यावेळी कंत्राटदार अर्जून काटे, राजू काटे, गणेश सवडे, कंपनीचे प्रकल्प प्रमुख अशोक मानकर प्रामुख्याने उपस्थित होते.
विंध्यवासिनी कंपनीचे अध्यक्ष विजय गुप्ता म्हणाले, कंपनीने सर्व अडचणींवर मात करून चौपदरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन केले. येत्या आठवडय़ापासून रस्त्याचे काम पूर्ण जोमाने सुरू करीत असून पावसाळ्यापूर्वी हा रस्ता पूर्ण करण्याचे आमचे नियोजन आहे. देऊळगांवराजा वळण रस्त्याचे काम मार्गी लावण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. जालना ते खामगांव हा महामार्ग संपूर्ण क्षमतेने पूर्ण होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्राप्त माहितीनुसार कंपनीने या कामास प्रारंभ करण्यापूर्वी यापूर्वीच्या उपकंत्राटदारांच्या थकलेल्या रक्कमा अदा केल्या आहेत. शिवाय, नव्याने उपकंत्राटदार नियुक्त करून त्यांच्या कामाची विभागणी करून दिली आहे. या महामार्गासाठी येथील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब ठेंग यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अनंत अडचणींवर मात करून या रस्त्याचे काम अतिशय जोमाने व गतीने सुरू होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. कामाची गुणवत्ता जोपासण्यासोबत ते काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे सुतोवाच त्यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2014 2:37 am

Web Title: jalna khamgaon road construction gets green signal
Next Stories
1 पोटासाठी बालवयात आजही त्यांचा जीवन संघर्ष
2 राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षाला तडीपारीची नोटीस
3 ‘आप’ साठी विदर्भातील इच्छुकांची मुंबईत मुलाखतीसाठी गर्दी
Just Now!
X