कुकडीच्या पाण्याचे जामखेडकरांचे अनेक पिढय़ांचे स्वप्न अखेर आज ‘मार्गस्थ’ झाले, जामखेड तालुक्यात अखेर गंगा अवतरली!
चौंडी तलावाच्या दिशेने कुकडीचे पाणी सुरू झाल्याने जामखेडकरांनी आज प्रंचड जल्लोष केला. पालकमंत्री बबनराव पाचपुते स्वत: आज चौंडीला आज पाणी सोडणार असे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कोठारी यांनी सकाळीच जाहीर केले. लगेचच तालुक्यात आंनदाला उधाण आले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर कुकडीचे पाणी आणले अषा घोषणा देत व फटाके फोडून फेरी काढली. यावेळी घनशाम शेलार, दत्ता वारे, शहाजी राळेभात, सखाराम भोरे आदी त्यात सहभागी झाले होते. यांचे सह अनेक पदधिकारी व मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते.
दुसरीकडे आज सकाळी कुकडीचे पाणी चौंडी तलावात सोडणार असल्याचे वृत्त समजताच भाजपचे आमदार राम शिंदे, पी. जी. गदादे, सूर्यकांत मोरे, वैजीनाथ पाटील, भगवान मुरमकर आदींसह भाजप, शिवसेना, काँग्रेस, मनसे, आरपीआय व मुस्लीम संघटनांचे पदधिकारी खर्डा चौकात जमले. त्यांनीही गुलालाची उधळण करीत फटाके वाजवून पेढे वाटप केले व घोषणा देत आनंद साजरा केला.
त्यानंतर कर्जत येथे येऊन पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी कुकडीच्या पाण्याचे पुजन केले. यावेळी राजेंद्र कोठारी, राजेंद्र फाळके, राजेद्र गुंड, नानासाहेब निकत, नितीन धांडे आदी उपस्थित होते. आमदार राम शिंदे यांनी कुकडीच्या पाण्यात उडी मारून वंदन केले. त्यांच्यासह नामदेव राऊत, भगवान मुरूमकर, पी. जी. गदादे, सूर्यकांत मोरे यांनी या कालव्यात पोहण्याचाही आनंद लूटला.