जनमंच या संस्थेतर्फे वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी ‘विदर्भ मुक्ती यात्रा’ काढली जाणार आहे. ही यात्रा उद्या, शनिवारी, २० सप्टेंबरला सकाळी १० वाजता बुलढाणा जिल्ह्य़ातील सिंदखेड राजा या जिजामातेच्या जन्मगावापासून निघणार आहे.  
हा लढा जनतेचा असल्याने यात्रेचे नेतृत्व कुणीही करणार नाही. यात्रेच्या अग्रभागी असलेल्या रथावर राष्ट्रमाता जिजाबाई, महात्मा गांधी, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमा राहतील. या यात्रेत विदर्भाच्या सर्व जिल्ह्य़ांतून निघालेले कार्यकर्ते व नागरिक मार्गात ठिकठिकाणी आपापल्या वाहनांसह सहभागी होतील. संध्याकाळी ही यात्रा अकोला मार्गे अमरावतीला पोहोचेल. रात्री तेथे मुक्काम करून २१ सप्टेंबरला सकाळी नागपूरकडे रवाना होईल. सायंकाळी ५ वाजता या यात्रेचा समारोप दीक्षाभूमी येथे होईल.  
यात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी जनमंचकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. यात्रेचे जेव्हा नागपुरात आगमन होईल, तेव्हा नागपुरातील दोनशे तरुण मोटारसायकलने वाडी ते दीक्षाभूमीपर्यंत यात्रेच्या अग्रभागी राहतील.
स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी विदर्भ विरोधकांना खणखणीत इशारा देण्यासाठी नागरिकांनी यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन अ‍ॅड. अनिल किलोर, प्रा. शरद पाटील, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे, सचिव राजीव जगताप, उपाध्यक्ष प्रमोद पांडे, सहसचिव अ‍ॅड. मनोहर रडके यांनी केले आहे.