संपूर्ण देशाला अन्न पुरविणाऱ्या शेतक ऱ्यांची स्थिती शासनाच्या घातक धोरणामुळे वरचेवर वाईट होत चालली असून त्यांच्या उत्तरायुष्याच्या हमीसाठी साठ वर्षांपुढील प्रत्येक शेतक ऱ्याला दरमहा दोन हजार रुपये पेन्शनच्या मागणीसाठी येत्या ६ मार्च रोजी मुंबईत आझाद मैदानावर प्रदेश धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येणार असून या आंदोलनात राज्यातील शेतक ऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी केले.
जनता दलाने (धर्मनिरपेक्ष) राज्यातील भीषण दुष्काळ, वाढती महागाई, आगामी संकटांचे गांभीर्य ओखळून डॉ. राममनोहर लोहिया स्मृतिदिनापासून शेतकरी पेन्शन योजना अभियान हाती घेतले आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रा. शरद पाटील यांच्या उपस्थितीत अक्कलकोट तालुक्यात तडवळ, नागणसूर आदी गावांमध्ये शेतकरी पेन्शन मेळावे झाले. त्या वेळी ते बोलत होते.
नागणसूर येथे झालेल्या शेतकरी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी गुरुलिंगप्पा माशाळे होते. या वेळी बोलताना प्रा. शरद पाटील म्हणाले, सरकारने नेहमीच शेतकरीविरोधी व व्यापाऱ्यांच्या हिताची धोरणे राबविल्यामुळे शेतक ऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होत असून सध्याच्या दुष्काळी स्थितीत तर शेतकरी मरणपंथाला लागला आहे. त्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्यामुळे त्यांच्यापासून अपत्येही दुरावत आहेत. शेतक ऱ्यांना अनेक व्याधींनी ग्रासले असून या परिस्थितीत शासनाला जबाबदारी ढकलता येणार नाही, असे प्रा.शरद पाटील यांनी निक्षून सांगितले. या वेळी सांगलीचे जनार्दन गोंधळी, अ‍ॅड. फय्याज झारी, बसलिंगप्पा थंब, शंकर दोडमणी आदींची भाषणे झाली. या मेळाव्यास पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते काशीनाथ जावेर, सिद्धप्पा पवार, पंडित अरवत (कोर्सेगाव), तमण्णा अरवत, जेटप्पा मलगोंडा, गिरमला उमदी आदींची प्रमुख उपस्थिती होती.