महाराजा शिव छत्रपती प्रतिष्ठान निर्मित व मनोवेध प्रस्तुत जगातील क्रमांक एकचे महानाटय़ ‘जाणता राजा’ २६ ते ३१ जानेवारी या कालावधीत जिल्हा क्रीडांगणावर होत आहे. या महानाटय़ाचे उद्घाटन गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या हस्ते २६ रोजी होणार असून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, महिला आघाडी अध्यक्ष स्मृती इराणी प्रयोगाला उपस्थित राहणार आहेत.
 बहुचर्चित महानाटय़ाची या जिल्ह्य़ातील रसिक श्रोत्यांना बऱ्याच वर्षांपासून प्रतिक्षा होती. मनोवेध या सांस्कृतिक संस्थेने यासाठी पुढाकार घेतला आणि येत्या २६ जानेवारी रोजी हे नाटय़ येथे होत आहे. या महानाटय़ात एकूण तीनशेहून अधिक कलावंत काम करित आहेत. त्यात शंभरावर कलावंत स्थानिक आहेत. या सर्व कलावंतांची निवड स्थानिक जनता महाविद्यालयाच्या सभागृहात १६ डिसेंबर रोजी नाटय़ कलावंत प्रशांत मडपूवार यांच्या नेतृत्वात पार पडली. या निवड चाचणी कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ.अशोक जिवतोडे यांनी केले तर परिक्षक म्हणून नाटय़ कलावंत प्रशांत कक्कड, मानस रामटेके उपस्थित होते. या महानाटय़ात हत्ती, घोडे, उंट, पालख्या व तोफांचा प्रत्यक्ष वापर करण्यात आलेला आहे. रसिक श्रोत्यांना सोईचे व्हावे म्हणून जिल्हय़ातील पंधराही तालुक्यात तिकीट विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या जिल्हय़ातील ६० एमएससीआयटी केंद्रावर तिकीट विक्री सुरू असून चंद्रपूर शहरात जाणता राजाचे कार्यालय सुरू करण्यात आलेले आहे. या महानाटय़ाचे उद्घाटन गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या हस्ते २६ जानेवारी रोजी होणार आहे. तसेच २८ जानेवारीला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, महिला आघाडी अध्यक्ष स्मृती इराणी हजेरी लावणार आहेत. या विलक्षण महानाटय़ाचा लाभ जिल्हय़ातील रसिकश्रोत्यांनी घ्यावा असे आवाहन मनोवेधच्या वतीने करण्यात आले आहे.