मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांबाहेर सुरू करण्यात आलेल्या जनसाधारण तिकिट खिडक्या चालवणे वितरकांची डोकेदुखी ठरू लागली आहे. रेल्वेच्या वतीने सुविधा पुरविण्याच्या दिरंगाईमुळे वितरक हवालदिल झाले आहेत. रेल्वे तिकीट खिडक्यांच्या तुलनेने जनसाधारण तिकिट खिडक्यांमधून देण्यात येणाऱ्या सुविधेमध्ये अनेक मर्यादा आहेत, याचा फटकादेखील वितरकांना बसत आहे. त्यामुळे अनेकवेळा या वितरकांना प्रवाशांच्या रोषाला सामोर जावे लागते. नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी २० टक्के प्रवासी या सुविधेचा लाभ घेत असूनही याकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे या जेटीबीएस धारकांचे म्हणणे आहे.
मध्य रेल्वेच्या विविध स्थानकातील तिकीट खिडक्यांच्या लांबच लांब रांगा रोखण्यात अपयशी ठरत असलेल्या रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकांच्या बाहेर खाजगी व्यक्तींच्या माध्यमातून रेल्वे तिकीट विक्रीची सुविधा सुरु केली. जनसाधारण तिकीट प्रणाली अर्थात ‘जेटीबीएस’ असे नाव असलेल्या या उपक्रमाअंतर्गत विविध स्थानकांच्या बाहेर खाजगी तिकीट खिडक्या कार्यान्वित झाल्या. मध्य रेल्वेच्या नागपूर, भुसावळ आणि पुणे विभागासह उपनगरीय रेल्वेमार्गावर सुमारे २५१ तिकीट खिडक्या जनसाधारण प्रणालीद्वारे कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. अशा खाजगी तिकीट विक्री सुविधा केंद्रांची सर्वात मोठी संख्या उपनगरीय रेल्वे स्थानकांच्या परिसरात असून त्यांना प्रतिसाद खूप मोठा आहे. तिकीट काढल्यानंतर त्यावर १ रुपयांचा सेवा कर वसूल करण्याचे हक्क या वितरकांना देण्यात आले आहेत. लोकल तिकीट, मेल गाडय़ांचे तिकीट आणि पास या सेवा या प्रणालीद्वारे देण्यात येत असल्या तरी अनेक मर्यादा या वितरकांवर आहेत. या मर्यादा दूर करून जेटीबीएसधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नुकतीच जेटीबीएसधारकांनी रेल्वे बोर्डाच्या चेअरमनकडे पत्राद्वारे केली आहे. तिकीट काढण्याच्यासाठीच्या यंत्रणेमध्ये अनेकवेळा तांत्रिक बिघाड निर्माण होत असून तो दूर करण्यासाठी रेल्वेकडून पुरविले जाणारे तांत्रिक सा’ा मोठय़ा दिरंगाईनंतर उपलब्ध होत असते.
संगणकाद्वारे तिकीट देण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य पोहोचविण्यासाठी सुद्धा विलंब होत असून अनेकवेळा रेल्वेची ऑनलाईन लिंक बंद राहिल्याने ही प्रणाली बंद ठेवावी लागते. तांत्रिक त्रुटी लवकरात लवकर दूर केल्यास प्रवाशांना चांगली सुविधा देणे अधिक सोपे होईल, असे या वितरकांचे म्हणणे आहे.
जनसाधारणमध्ये नसलेल्या सेवा..
प्रवास विस्तार तिकीट, नवा पास काढण्याची सुविधा, सुपरफास्ट मेल एक्स्प्रेसची वाढीव तिकिटे, पर्यटन तिकिटे अशा तिकीट सुविधा जनसाधारण तिकीट विक्रेत्यांकडून मिळत नाहीत. तर प्रवाशांनी खरेदी केलेले तिकीट रद्द करण्याची व्यवस्थादेखील जनसाधारण तिकीट घरांमध्ये नाही. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने तिकीट काढले आणि ते रद्द करायचे असल्यास त्याला रेल्वेच्या तिकीटघरांमध्ये जाण्याशिवाय पर्याय उरत नाही अन्यथा ते तिकिटाचे पैसे वाया जातात.