जपान आणि भारताच्या संस्कृतीमध्ये अनेक गोष्टींचे साम्य असून भारतातील संस्कृती, येथील उत्सवांबद्दलचे अप्रूप जपानमध्येही आहे. भारतातील अनेक संस्कृत शब्द जपानमध्येही प्रचलित शब्द म्हणून वापरले जातात. जपान आणि भारतीय संस्कृतीतील अधिक साम्यस्थळे शोधण्याच्या उद्देशाने जपानच्या विद्यार्थाच्या एका चमूने ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर विद्यालयाला भेट देत येथील संस्कृतीचा अभ्यास करण्याबरोबरच येथील गणेशोत्सवातही भाग घेतला.
भारताच्या या वेगळेपणाची भुरळ जपानच्या कोयोटो सांगोय विद्यापीठाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. मिचीओ यानो यांनाही  पडली. भारत-जपान सांस्कृतिक आदान प्रदान या उपक्रमाअंतर्गत संस्थेच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात पंधरा दिवसांचा विशेष अभ्यासवर्ग जपानच्या विद्यार्थासाठी आयोजित करण्यात आला होता. २ ते १४ सप्टेंबर दरम्यान हा अभ्यासक्रम बेडेकर महाविद्यालयामध्ये झाला. त्यामध्ये विद्यार्थाना गणेशोत्सवाची विशेष ओळख करून देण्यात आली.
इटो किरीयो, तनिकूची टकूया, इरोई फियोशी, होमोरी सुयोसी या तीन मुलांसह बंडाई टोमोको, होशोडा युयी, टकायशी मरीना, टाकाई रिका, तनिमुरा निजुली, यामा गुची शिमोरी, यामाझाटी युकीगो, युकिमाशो दरिका असे या सहभागी विद्यार्थाची नाव होती. भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणारे हे विद्यार्थी पंधरा दिवसांमध्ये गणेशोत्सवामध्ये सर्वात जास्त रमले. गणपतीची आरती त्यांनी समजून घेत तिचा नेमका अर्थ जाणून घेतला. ठाण्यातील १०४ वर्षांची परंपरा असलेल्या गणेशोत्सवांना त्यांनी भेटी दिल्या.  
संस्कृतमधील जपानीमधील प्रचलित शब्द..
मिचिओ यांनी भारतातून प्रवाहित होऊन जपानमध्ये गेलेल्या अनेक शब्दांची ओळख करून दिली. त्यामध्ये भारतामध्ये असुर हा शब्द जपानमध्ये अशूरा असा वापरला जातो. तर आचार्य हा शब्द अजार्य म्हणून प्रचलित आहे. भारतातील बुद्धिस्ट मंदिरांची रचनाही भारतातून प्रवाहित होऊन तिकडे रूढ झाल्याचे मिचिओ यांनी सांगितले.