भारतीय जनता पक्षाचे प्रभाग १८ ब मधील उमेदवार जसपाल पंजाबी अर्जाच्या छाननीत सहीसलामत सुटले, मात्र निवडणूक कार्यालयाच्या आवारातच पोलिसांच्या जाळय़ात अडकले. जुन्या गुन्हय़ात त्यांना तोफखाना पोलिसांनी अटक केली.
छाननीचा निकाल लागल्यानंतर जल्लोषातच पंजाबी जुन्या महानगरपालिका कार्यालयातून बाहेर पडत असताना या प्रवेशद्वारातच पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध यापूर्वीच सन २०११ मध्ये घरगुती वादातून दाखल झालेल्या मारहाणीच्या खटल्यात (आरटीसी क्रमांक २८/११) अटक करण्यात आली. या खटल्याच्या सुनावणीत वारंवार वॉरंट काढूनही पंजाबी गैरहजर राहिल्याने अखेर त्यांना अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले. त्यातच तोफखाना पोलिसांनी त्यांना गुरुवारी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंजाबी यांना उद्या (शुक्रवार) प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांपुढे हजर केले जाईल.
दरम्यान, भाजपचे श्रीपाद छिंदम (प्रभाग १७ अ) आणि पंजाबी या दोघांचे उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. याबाबत दाखल झालेल्या हरकती निवडणूक निर्णय अधिका-यांनी गुरुवारी फेटाळून लावल्या.
मनपा निवडणुकीतील उमेदवारीअर्जाची बुधवारी छाननी झाली. छाननीत छिंदम व पंजाबी यांच्या उमेदवारी अर्जावर प्रतिस्पर्धी इच्छुकांनी हरकती घेतल्या होत्या. दोघांच्या विरोधात अतिक्रमणाचा आक्षेप होता. शिवाय पंजाबी यांच्या आडनावालाही आक्षेप घेण्यात आला होता. त्यावर बुधवारीच सुनावणी झाली, मात्र निकाल राखून ठेवण्यात आला होता. तो आज देण्यात आला. त्यात या दोन्ही उमेदवारांच्या अर्जावरील हरकती फेटाळून लावत त्यांचे अर्ज वैध ठरवण्यात आले.