प्राप्तिकर खात्याला सादर केलेल्या वार्षिक रिटर्नमध्ये काहीही घोळ नसताना विनाकारण लाच मागणारे प्राप्तिकर खात्याचे सहआयुक्त संजीव घेई यांना पकडून देणारे व्यावसायिक जसुभाई वाघानी यांनी आता उघडपणे याविरुद्ध लढाई करण्याचे ठरविले आहे. आपल्याला आता प्राप्तिकर अधिकारी खूप त्रास देतील, याची कल्पना आहे. परंतु आपण कुठलीही चोरी करीत नसल्यामुळे कोणत्याही परिणामांना तोंड देण्यास तयार आहोत, असे वाघानी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. प्राप्तिकर खात्याकडून शक्यतो तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले जाते. परंतु वाघानी यांनी स्वत:च आपले नाव उघड केले आहे.
२००६ मध्येही वाघानी यांनी ठाणे प्राप्तिकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त पंकज गर्ग आणि निरीक्षक अनिल मल्लेल यांना अनुक्रमे अडीच लाख आणि २५ हजार रुपयांची लाच घेताना पकडून दिले होते. त्यानंतर आपल्या खात्याची तपासणी करण्याचा आदेश प्रत्येक वर्षी निघतो. त्यात काहीही आढळत नाही. परंतु दरवर्षी तपासणी ठरलेलीच असते. आपण कुठलाही घोळ करीत नसतानाही येनकेनप्रकारेण आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो. तरीही आतापर्यंत एकदाही लाच दिलेली नाही. यापुढेही देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपला व्यवसाय बोरिवलीत असून तो मुंबई प्राप्तिकर खात्याकडे वर्ग करावा, असा अर्ज २०१० मध्ये दिला होता. तरीही त्यावर कारवाई केली जात नाही. उलटपक्षी ठाणे कार्यालयाकडूनच तपासणी होते. आपली फाईल ‘विशेष’ असते, असेही वाघानी यांनी सांगितले.
घेई यांनी सुरुवातीला माझ्या करसल्लागारांकडे १५ लाख रुपये मागितले. परंतु वाघानी तसा कुठलाही गैरप्रकार करीत नसल्यामुळे ही रक्कम खूप मोठी होते. आपण ते वाघानी यांनाच सांगा, असे सल्लागाराने सुचविले. त्यानुसार आपण भेटण्यासाठी गेलो तेव्हा घेई यांनी दहा लाख रुपये मागितले. या रकमेपैकी ५० टक्के फक्त आपल्या खिशात जाईल, असे सांगणाऱ्या घेई यांना सुरुवातीला आपण याआधी दोन प्राप्तिकर अधिकाऱ्यांना पकडून दिले होते, याची माहिती मिळाली. त्यानंतरही त्यांनी साडेतीन लाख रुपये द्यावेच लागतील. मात्र ते आपण करसल्लागारामार्फत स्वीकारू, असे सांगितले. त्यासाठी त्यांनी दिल्लीतील एक क्रमांकही दिला होता. मात्र वाघानी यांनी सुरुवातीपासूनच सारे ध्वनिमुद्रित करीत सीबीआयला ऐकविले आणि त्यानंतर या सापळ्याची तयारी सुरू झाली. या सापळ्यात घेई अडकले.
दरवर्षी तपासणी; पण हाती काही नाही
जसुभाई वाघानी यांचा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांची वार्षिक उलाढाल २८ ते २९ कोटी असते. मात्र नफ्याचे प्रमाण कमी असते. या मुद्दय़ावर २००६ मध्ये त्यांची फाईल पहिल्यांदा तपासणीसाठी काढण्यात आली. मात्र त्यात काहीही आढळले नाही तरी त्यांच्याकडे पावणेतीन लाखांची लाच मागण्यात आली. त्यानंतर त्यांनी दोन प्राप्तिकर अधिकाऱ्यांना पकडून दिल्यावर त्यांची फाईल दरवर्षी तपासणीसाठी आवर्जून काढली गेली.