जायकवाडी धरणासाठी निळवंडे धरणातून नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी ओझर बंधा-यावर रोखून संतप्त शेतक-यांनी ते लाभक्षेत्रातील कालव्यात वळवले. येथील चाकच शेतक-यांनी उघडल्याने दिवसभर कालव्यामधूनही पाणी सुरू होते. ते बंद करण्यासाठी गेलेल्या पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांनाही शेतक-यांनी मज्जाव केला. शेतकरी दिवसभर ओझर बंधाऱ्यावर ठाण मांडून होते.
निळवंडे धरणातून अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, राहुरी या तालुक्यांतील गावांसाठी पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले होते. मंगळवारी पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनामध्येच जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यात आल्याने शेतक-यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले. आज पहाटे तीन वाजता प्रवरा डाव्या व उजव्या कालव्याचे पाणी बंद करून जायकवाडीसाठी ओझर बंधाऱ्यातून पाणी सोडण्यात आले. सदर बाब शेतक-यांना कळताच पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, उपाध्यक्ष रामभाऊ भुसाळ यांच्या नेतृत्वाखाली भगवानराव इलग, प्रभाकर निघुते, विनायक बालोटे, नारायण कहार, कैलास तांबे, मच्छिंद्र थेटे आदींसह ४०० ते ५०० शेतक-यांनी सकाळी सहा वाजताच ओझर बंधाऱ्यावर धाव घेऊन कुणाला कळण्याच्या आतच प्रवरा डाव्या व उजव्या कालव्याच्या दरवाजांच्या साखळय़ा काढून कालव्यांमध्ये पाणी सोडले. ही घटना प्रशासनाला कळताच पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता किरण देशमुख, शाखा अभियंता सुरेश जगधने यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा ओझर बंधा-यावर दाखल झाला.
या वेळी संतप्त झालेल्या शेतक-यांनी जलसंपदामंत्री सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निषेधाच्या घोषणा देत समन्यायी वाटपाचा कायदा रद्द करा, अन्यायकारक पाणी सोडणे बंद करा, अशा घोषणा देत जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांचा प्रतीकात्मक पुतळा फासावर लटकवून त्याचे दहन केले. शेतकरी ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने बुधवारी सायंकाळपर्यंत प्रवरा डाव्या कालव्यातून ६०० क्युसेक्स वेगाने व उजव्या कालव्यातून २२५ क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता. तर ३५० ते ४०० क्युसेक्स वेगाने पाणी नदीपात्रात जात होते.