नियमांचे उल्लंघन करून काम करण्याची सवय जडलेल्या पेंच व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने पुन्हा एकदा त्याची प्रचिती दिली आहे. व्याघ्र प्रकल्प आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी असलेल्या अभयारण्यात नियमांचे उल्लंघन करून जेसीबीने खोदकाम करण्याचा आणि वृक्षतोडीचा प्रकार नुकताच पेंच व्याघ्र प्रकल्पात उघडकीस आला आहे. मात्र, मंत्रालयातील वनखात्यातील तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या प्रशासनाला असलेले आशीर्वाद, हा चर्चेचा विषय ठरला आहे.
व्यवस्थापन आराखडय़ाच्या नावाखाली राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्यात सर्रासपणे वृक्षतोड, बांधकाम, गवत कापणी, रस्ते बांधकाम, वाळू काढणे यासारखे प्रकार होत असल्याचे केंद्रीय शक्तीप्रदान समितीच्या लक्षात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्याची दखल घेतली आणि आदेश जारी केले. सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्यातील संरक्षित क्षेत्रात मृत अथवा मृतावस्थेतील झाडांची तोड करता येणार नाही. एवढेच नव्हे तर साधे गवतसुद्धा विनापरवाना काढता येणार नाही. वनजमिनीव्यतिरिक्त इतर जमिनीवरील झाडे, बांबू, झाडांच्या फांद्या तोडता येणार नाही किंवा विनापरवाना विविध बांधकामसुद्धा करता येणार नाही, असे १४ फेब्रुवारी २०००च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात नमूद आहे.
या आदेशाचे पालन करण्यासंदर्भात वनखात्याला तत्कालीन सदस्य सचिव एम.के. जिव्राजका यांनी सूचित केले. मात्र, त्यानंतरही पेंच व्याघ्र प्रकल्प प्रशासनाकडून वारंवार सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाची अवहेलनाच करण्यात आली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प प्रशासनांतर्गत येणाऱ्या उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात २०१२ मध्ये रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. त्यासाठी जेसीबीचा वापर आणि वृक्षतोडसुद्धा करण्यात आली. या प्रकरणात तत्कालीन प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एस.डब्ल्यू.एच. नकवी यांनी तत्कालीन अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक ए.के. सक्सेना यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. बेकायदेशीररीत्या होणारे काम तात्काळ थांबवून अहवाल सादर करण्यास पेंच प्रशासनाला सांगण्यात आले. मात्र, या आदेशालासुद्धा केराची टोपली दाखवण्यात आली. त्यावर ही खेदजनक बाब असल्याचे पत्रही सक्सेना यांनी दिले.
पेंच व्याघ्र प्रकल्पातसुद्धा अशी कामे करण्यात येत असावी, असा अंदाज या पत्रात व्यक्त करण्यात आला होता आणि तो आता खरा ठरला आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पातल्या कोअर क्षेत्रातील बखारी तलावाजवळचे क्षेत्र, सॅलड धरणाजवळचे क्षेत्र तसेच सिल्लारी ते तोतलाडोहच्या कोअर क्षेत्रातून जाणाऱ्या जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत दहा क्रमांकाच्या पुलाजवळ सर्रासपणे जेसीबीने खोदकाम सुरू आहे. मोठमोठी झाडेही मुळासकट उखडण्यात आली आहेत. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आशीर्वाद या सर्व बेकायदेशीर कामावर पांघरुण घालण्याचे काम करीत आहे.
राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) ए.के. सक्सेना यांना या प्रकरणात काय कारवाई करणार, असे विचारले असता ही बाब वन्यजीव विभागाच्या अखत्यारितील आहे. त्यामुळे तेच याविषयी निर्णय घेतील. तक्रार आल्यास आम्ही कारवाई करू. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सर्जन भगत यांच्याशी सतत दोन दिवस संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण ते कधी मुंबई तर कधी दिल्लीला असल्याचे सांगण्यात आले.