‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या (आयआयटी) ‘जेईई’ (सामाईक प्रवेश परीक्षा) या प्रवेश परीक्षेचा अभ्यास विद्यार्थ्यांना आता कधीही, कुठेही केवळ दोन अंगठय़ांच्या ‘टिप्स’वर करता येणार आहे. तोही जाहिरातमुक्त. विद्यार्थ्यांची सेलफोनशी जुळलेली गट्टी लक्षात घेऊन एका खासगी कंपनीने ‘जेईई-प्रेप’ हे अ‍ॅप्लिकेशन (अ‍ॅप) विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहे.
अ‍ॅण्ड्रॉइडवर चालणारे हे अ‍ॅप ‘प्लॅन्सेस एज्युसोल्युशन’ या माजी आयआयटीयन्सनी सुरू केलेल्या कंपनीने तयार केले आहे. जेईई मुख्य आणि अ‍ॅडव्हान्स या दोन्ही परीक्षांसाठी मार्गदर्शन या अ‍ॅपवर मिळेल. गुगल प्लेवरून संपूर्णपणे जाहिरातमुक्त असलेले हे अ‍ॅप विद्यार्थ्यांना मोफत डाऊनलोड करता येणार आहे.
‘प्रवेश परीक्षांमधील स्पर्धा गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढली आहे. केवळ कष्ट करून या परीक्षेत यश मिळविता येईलच, असे नाही. हे कष्टही ‘स्मार्ट’ असायला हवेत. त्यामुळे, विद्यार्थ्यांना कधीही, कुठेही जेईईची तयारी करता येणे शक्य व्हावे, या दृष्टीने आम्ही हे अ‍ॅप विकसित केले आहे,’ अशी माहिती प्लॅन्सेसचे व्यवस्थापकीय संचालक विवेक गुप्ता यांनी दिली. ‘सेलफोन हे अभ्यासापासून विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित करणारे महत्त्वाचे साधन बनले आहे. पण, आम्ही त्यालाच त्यांच्या अभ्यासाचे माध्यम बनविले आहे,’ अशी पुस्ती त्यांनी जोडली.
दरवर्षी तब्बल १५ लाख विद्यार्थी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश परीक्षा देतात. त्यापैकी अनेकांना आयआयटीत प्रवेश घेण्यात रस असतो. हे लक्षात घेऊन जेईई-प्रेपच्या माध्यमातून आधीच्या जेईईमध्ये दर्जेदार कामगिरी केलेल्या १०० विद्यार्थ्यांची (आयआयटी गुरूज) मार्गदर्शनरूपी व्याख्याने प्लॅन्सेसने या अ‍ॅपवर उपलब्ध करून दिले आहेत.
या शिवाय जेईईसाठी दर्जेदार संदर्भ पुस्तकांच्या मदतीने संक्षिप्त असे अभ्याससाहित्यही या अ‍ॅपवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. केवळ जेईईच नव्हे तर विविध शिक्षण मंडळांच्या परीक्षांची तयारीही विद्यार्थ्यांना या अ‍ॅपच्या मदतीने करता येऊ शकेल, असा प्लॅन्सेसचा दावा आहे.
अ‍ॅपवर हे मिळेल
ग् ८८ विषयांवरच्या नोट्स
ग् तीन हजार सोडविलेली उदाहरणे
ग् गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका
ग् सध्याचे मुख्य आणि अ‍ॅडव्हान्स परीक्षेचे पॅटर्न
ग् जेईई ग्रंथ सीरिजच्या व्हिडीओ
ग् आयआयटी गुरूजचे मार्गदर्शन
ग् कठीण विषयांवर मार्गदर्शन
ग् प्रश्न सोडविण्यासाठीच्या उपयुक्त टिप्स
ग् जेईईच्या संदर्भातील बातम्या
ग् घडामोडींची माहिती
ग् आयआयटीचा प्लेसमेंट अहवाल