दीड दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी समुद्रात गेलेल्यांना दुखापत करणारे ‘जेली फिश’ आणि ‘स्टिंग रे’ मुंबईच्या समुद्रात नेहमीच सापडत असून त्यांचा धसका घेण्याची काहीही आवश्यकता नाही. समुद्रात वर्षांनुवष्रे मासेमारीसाठी जात असलेल्या कोळी बांधवांच्या जाळ्यात हे दोन्ही जलचर अनेकदा येतात आणि त्यामुळे आतापर्यंत कोणालाही फारसा त्रास झालेला नाही, असे आढळून आले आहे.
 ‘स्टिंग रे’ आणि ‘जेली फिश’मुळे पायांना असह्य वेदना झाल्याने तब्बल ६७ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. गणेशचतुर्थीच्या पाचव्या, सातव्या व दहाव्या दिवशीच्या विसर्जनासाठी लाखो लोक किनाऱ्यावर येत असल्याने या काळात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लहान मुलांना पाण्यात नेण्यावर महानगरपालिकेने मनाई केली आहे. त्याचप्रमाणे मोठय़ांनाही गमबूट घालण्याचा सल्ला दिला आहे. त्याचप्रमाणे हे जलचर समुद्रकिनाऱ्यावर कसे आले, याबाबत तज्ज्ञांकडून माहितीही मागवण्यात आली. मात्र रोजच समुद्राशी सबंध येत असलेल्या कोळी बांधवांसाठी हे दोन्ही जलचर नेहमीचेच आहेत.
यावेळी ‘स्टिंग रेचं’ पानी आलंय..
समुद्रातील पाण्याच्या प्रवाहासोबत माशांचे थवे पोहत असतात. त्यामुळे मासेमारी करताना एखाद्या दिवशी सर्व पापलेट जाळ्यात येतात. कधीतरी कोळंबीने जाळे भरले जाते. त्यावरून ‘आज पापलेटचं पानी आलंय’, ‘आज कोळंबीचं पानी आलंय..’ असे बोलले जाते. पापलेटाचं पाणी आलं आहे, अशी चर्चा आमच्याकडे रविवार-सोमवारी झाली होती, अशी माहिती कुलाब्यातील बधवार पार्क येथे राहणाऱ्या दामोदर तांडेल यांनी दिली. पाण्यासोबत आलेले माशांचे थवे साधारण आठवडाभर समुद्राच्या विशिष्ट भागात राहतात आणि मग पाण्याच्या प्रवाहासोबत पुढे सरकतात. त्याचप्रमाणे स्टिंग रेदेखील निघून जाईल, त्यांचा धसका घेण्याची काहीही आवश्यकता नाही, असे त्यांनी सांगितले.
आवाजाला घाबरतो
स्टिंग रे हा घाबरणारा जलचर आहे. तो आवाजाला घाबरून दूर पळतो. त्यामुळे होडय़ांचे आवाज असलेल्या भागात तो सहसा फिरकत नाही. मात्र गिरगाव, राज्यपालांचा बंगला या भागात मासेमारी करायला बंदी असल्याने तुलनेने शांत असलेल्या या भागात हे मासे पोहोचले असावेत, असे त्यांना वाटते. हे मासे चावत नाहीत. मात्र त्यांच्या शेपटाचा तडाखा कधीतरी बसू शकतो. त्यामुळे पायाला सूज येते. मात्र गरम पाण्याने शेकले आणि चुना लावला की ते बरे होतात. जाळ्यात आलेल्या स्टिंग रे चे शेपूट कोळ्यांच्या घरात संरक्षणासाठी लावले जाते.
जेली फिश बिनविषारी..
पावसाळा संपताना तापमान वाढू लागते. या वेळी दक्षिण भागातील मासे उत्तरेकडे सरकू लागतात. यावेळी पावसाचा हंगाम लवकर संपत असल्याने सध्या मुंबई लगतच्या समुद्रात भरपूर मासे आहेत. थंडीच्या काळात ते किनाऱ्यापासून दूर सरकण्यास सुरुवात होईल. त्यामुळे स्टिंग रे, जेली फिश किनाऱ्याजवळ आढळत आहेत, असे मढ मच्छिमार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष किरण कोळी म्हणाले. पापलेट, सुरमई हे मासे चिखलात सापडतात, कोळंबी दगडी भागांमध्ये सापडते तसे जेली फिश किनाऱ्यावर वाळूत असतात. छत्रीच्या आकाराचा पारदर्शक असलेल्या या जलचराला बारीक तंतूची झालर असते. स्थानिक भाषेत त्याला घागरा म्हणतात. हे तंतू पायाला चिकटले की त्याचे वळ उठतात, खाज येते आणि वेदना होतात. गरम समईला हात लागल्यावर जाणवतो, तसे चटके लागतात. मात्र सध्या किनाऱ्यावर असलेला चंदेरी रंगाचा जेली फिश हा विषारी नाही. निळ्या रंगाचा खोल समुद्रात सापडणारा जेली फिश विषारी असतो. आमच्या जाळ्यांमध्ये तो अनेकदा येतो. मात्र आतापर्यंत कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही, असेही त्यांनी सांगितले.