केंद्रीय गृहमत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कार्यक्रमास उपस्थित राहून घराकडे परत निघालेल्या भाजपच्या नगरसेविका रोहिणी तडवळकर यांना वाटेत ‘धूम स्टाईल’ने दोघा चोरटय़ांनी अडवून सहा तोळे सोन्याचे दागिने हिसका मारून लुटून नेले. कंबर तलावाजवळ सायंकाळी हा प्रकार घडला.
जुळे सोलापुरात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयाचा उद्घाटन सोहळा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पार पडला. या समारंभाला उपस्थित राहून नगरसेविका रोहिणी तडवळकर या दुचाकीवरून घराकडे परत निघाल्या होत्या. वाटेत कंबर तलावाजवळ सय्यद बुखारी दर्गाहनजीक दोघे चोरटे मोटारसायकलवरून भरधाव वेगाने आले व तडवळकर यांच्या गळय़ातील सोनसाखळी व मंगळसूत्र हिसका मारून बळजबरीने पळवून नेले. लुटून नेलेल्या सोन्याच्या दागिन्यांची किंमत बाजारपेठेत सुमारे एक लाख ८० हजार एवढी आहे. सदर बझार पोलीस ठाण्यात या गुन्हय़ाची नोंद झाली आहे.
बँक ऑफ इंडिया फोडली
माढा तालुक्यातील लव्हे येथे बँक ऑफ इंडिया शाखा फोडून चोरटय़ांनी चार लाख २६ हजार ४४० रुपयांची रोकड लंपास केली. यासंदर्भात बँकेचे शाखाधिकारी दत्तात्रेय भीमराव राऊत यांनी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार बँकेच्या शाखेची भिंत चोरटय़ांनी पहाटे अंधारात फोडली व आत प्रवेश करून सीसी टीव्ही कॅमेरे व अलार्म यंत्रणेची वायर कापून स्ट्राँग रूम फोडली. त्यातील रोकड चोरटय़ांच्या हाती लागली.