पुणे विद्यापीठाच्या वर्धापनदिना निमित्त देण्यात येणारा ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’ यावर्षी प्रतापराव पवार, यशवंतराव गडाख, विलास वाघ, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. जब्बार पटेल, नलिनी नारवेकर यांना देण्यात येणार असल्याचे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांना गुरूवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
या वेळी कुलसचिव डॉ. दिलीप ढवळे, महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. व्हि. बी. गायकवाड, परीक्षा नियंत्रक संपदा जोशी, वित्त विभाग प्रमुख विद्या गारगोटे हे उपस्थित होते. पुणे विद्यापीठाचा ६४ वा वर्धापनदिन सोहळा रविवारी (१० फेब्रुवारी) आणि १०६ वा पदवीदान समारंभ शनिवारी (९ फेब्रुवारी) होणार आहे. वर्धापनदिन कार्यक्रमासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पुणे विद्यापीठाच्या १०६ व्या पदवीप्रदान सोहळ्याला विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष डॉ. वेद प्रकाश हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावर्षी ५८ हजार ६६८ विद्यार्थ्यांना पदवी दिली जाणार आहे. विविध विषयांमध्ये ७८ सुवर्णपदके आणि ३१० पीएच.डी दिली जाणार आहे. पदवीदान समारंभाच्या दिवशी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत.