जेएनपीटी बंदरासह जगातील इतर बंदरांमध्ये आवश्यक असलेल्या उच्चशिक्षित अधिकारी तसेच व्यवस्थापकांना प्रशिक्षण देणारे केंद्र उरणमध्ये उभारण्याचा निर्णय जेएनपीटी बंदराच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून या प्रशिक्षण केंद्राची उभारणी बेल्जियमच्या अॅट्रीप बंदराच्या सहकार्याने करण्यात येणार आहे. या जागतिक प्रशिक्षण केंद्राचा फायदा येथील स्थानिकांनाही होणार असल्याने स्थानिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर या प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीमुळे जगातील बंदर उद्योगात देशातील युवकांना रोजगार उपलब्ध होण्यासही मदत होणार आहे.
जेएनपीटी बंदराच्या विस्तारासंदर्भात अनेक निर्णय नुकत्याच विश्वस्त मंडळाच्या मुंबई येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आले आहेत. यामध्ये बंदरातील उद्योगात वाढ करण्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑगस्ट २०१४ मध्ये उद्घाटन करण्यात आलेल्या बंदरावर आधारित सेझची उभारणी, चौथे बंदर आदींना चालना देण्यात येणार आहे. तसेच पर्यटन क्षेत्रासाठी रस्ता आणि पाण्यावर चालणारी अॅम्फिबियन बससेवा त्याचप्रमाणे अपघातग्रस्तांसाठी ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी करण्यात येणार आहे. या निर्णयासह या बैठकीत बंदरातील उच्चपदस्थ अधिकारी तसेच व्यवस्थापकांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी बेल्जियमच्या अॅट्रीक बंदराच्या सहकार्याने प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जेएनपीटीचे विश्वस्त भूषण पाटील यांनी दिली आहे. उरण तालुक्यातील वीर वाजेकर महाविद्यालयाच्या शेजारील सेंट्रल रेल्वेसाठी बांधण्यात आलेल्या वसाहतीच्या पन्नास एकर जमिनीवर या प्रशिक्षण केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. या केंद्रात देशी-विदेशी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. देशातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील बंदरासाठी असलेले हे पहिले प्रशिक्षण केंद्र असणार आहे.
या प्रशिक्षणासाठी किमान पदवीधर असण्याची अट असणार असल्याचीही माहिती पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे या परिसरातील तरुणांनाही जागतिक स्तरावरील प्रशिक्षण मिळणार असल्याने केंद्राच्या उभारणीमुळे काही प्रमाणात रोजगाराचीही निर्मिती होणार आहे. याचा फायदा स्थानिकांना होणार आहे. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत येथील जनतेकडून केले जात असून केंद्राची उभारणी लवकरात लवकर करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात जेएनपीटीचे मुख्य व्यवस्थापक शिबैन कौल यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.