देशातील ६० टक्क्यांपेक्षा अधिक आयात-निर्यातीचा व्यवसाय करणाऱ्या जेएनपीटीसह जीटीआय व दुबई पोर्ट या दोन खासगी बंदरात दररोज आठ ते दहा हजार कंटेनर वाहने ये-जा करीत आहेत. या वाहनांसाठी रस्त्याची कमतरता असल्याने बंदर परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी येत्या वर्षांत जेएनपीटी बंदर परिसरातील सहा व चार पदरी रस्त्यांचे रुंदीकरण करून रस्त्यांचे बारा पदरी रस्त्यात रूपांतरण करण्यात येणार असल्याची माहिती जेएनपीटीचे अध्यक्ष एन.एन.कुमार यांनी दिल्याचे प्रसिद्धीपत्रात जाहीर करण्यात आले आहे.
बंदरातील आयात-निर्यातीसाठी कंटेनर वाहनांचा उपयोग केला जातो. या जड व लांबीने अधिक असलेल्या वाहनांची वर्दळ बंदर परिसरात होत असल्याने वाहतूक कोंडी तसेच अपघाताचीही समस्या निर्माण झाली आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षांत जेएनपीटीसह तीन बंदरांतून एकूण ४५ लाख कंटेनरची हाताळणी करण्यात आलेली आहे. यामध्ये सर्वात अधिक हाताळणी गेटवे टर्मिनल ऑफ इंडिया (जीटीआय) या बंदरातून १९ लाख कंटेनरची हाताळणी करण्यात आली आहे. त्यानंतर दुबई पोर्ट वर्ल्ड या बंदरातून १६ लाख, तर जेएनपीटीच्या स्वत:च्या बंदरातून १३ लाख कंटेनरची हाताळणी करण्यात आलेली आहे. या आर्थिक वर्षांत ८ टक्केची वाढ झालेली असून यामध्ये भविष्यात वाढ होणार आहे.
याच परिसरात जेएनपीटीच्या प्रस्तावित चौथ्या बंदराची क्षमता वर्षांला ५० लाख कंटेनर हाताळण्याची आहे. या बंदराच्या पहिल्या फेजचे काम २०१७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात जेएनपीटी परिसरातून जवळपास एक कोटी कंटेनरची हाताळणी केली जाणार आहे. बंदराच्या विस्तारासाठी जेएनपीटी ते आम्रमार्ग (नवी मुंबई), तसेच जेएनपीटी ते पळस्पे फाटा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ब या दोन्ही रस्त्यांचे सहा व आठ पदरी रस्त्यात रूपांतर करण्याच्या कामाचा शुभारंभ ऑगस्ट २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय भूपृष्ठ व जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आला, मात्र दोन्ही रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी लागणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रश्न प्रलंबित असल्याने रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू होऊ शकले नाही. त्यासाठी राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण तसेच सिडकोचे प्रयत्न सुरू आहेत.
प्रवासी मार्गिकेची मागणी
उरण तसेच जेएनपीटी परिसरात रस्त्यांचे रुंदीकरण केले जात असताना या मार्गावरील प्रवासी वाहनांसाठी सव्‍‌र्हिस रोड म्हणून स्वतंत्र मार्गिका ठेवण्यात आल्या नाहीत. त्यामुळे या मार्गावरील जड वाहनांच्या धडकेमुळे हलक्या व प्रवासी वाहनांतील खास करून दुचाकी वाहनचालक व प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाच्या वेळी स्वतंत्र प्रवासी मार्गिका निर्माण करण्याची मागणी उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी केली आहे.
जगदीश तांडेल, उरण