News Flash

जेएनपीटीचा व्यवसाय पुन्हा गुजरातकडे वळण्याची शक्यता

मुंबई बंदराला पर्याय म्हणून उभारण्यात आलेल्या जेएनपीटी बंदरातून देशाच्या आयात-निर्यातीच्या साठ टक्के व्यवसाय केला जात असून गेल्या चार ते पाच

| May 24, 2014 01:20 am

मुंबई बंदराला पर्याय म्हणून उभारण्यात आलेल्या जेएनपीटी बंदरातून देशाच्या आयात-निर्यातीच्या साठ टक्के व्यवसाय केला जात असून गेल्या चार ते पाच वर्षांपासून बंदरातील वाहतूक कोंडीमुळे येथील व्यवसाय गुजरातमधील बंदरांकडे वळल्याने जेएनपीटीच्या व्यवसायात घट झाली असताना जेएनपीटी बंदराकरिता मागविण्यात आलेल्या नवीन क्रेन्सही लांबणीवर पडल्याने पुन्हा एकदा जेएनपीटी बंदरातील व्यवसाय गुजरातकडे वळण्याची भीती जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
जेएनपीटी बंदरासह एकूण तीन बंदरे या परिसरात असून या बंदरातून वर्षांकाठी ४५ लाखांपेक्षा अधिक कंटेनरची हाताळणी केली जात आहे. मात्र या वर्षी जेएनपीटी बंदराच्या कंटेनर हाताळणीत घट झाली आहे. बंदरातील काम बंद, प्रकल्पग्रस्तांची आंदोलने, सातत्याने होणारी वाहतूक कोंडी यामुळे जेएनपीटी बंदरातील मालाची ने-आण करणाऱ्या अनेक कंपन्यांनी गुजरातकडे आपला व्यवसाय वळविला. गुजरातमधील रस्ते, सरकारी यंत्रणेचे सहकार्य यामुळे जेएनपीटी बंदराऐवजी व्यावसायिकांनी गुजरातला पसंती दिली आहे. असे असले तरी जेएनपीटी बंदरातील नैसर्गिक खोली पाहता मोठय़ा जहाजातील माल उतरविण्याची क्षमता जेएनपीटीमध्येच आहे. असे असले तरी जेएनपीटी बंदरातील वाढत्या उद्योगानुसार इन्फ्रास्ट्रक्चरच्या अभावामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. २०११ पासून जेएनपीटी बंदराचा स्वत:चा व्यवसाय वाढविण्याची मागणी येथील कामगार संघटना करीत आहेत. त्यासाठी पंचवीस वर्षांपूर्वीच्या क्रेन्स बदलून नव्या क्रेन्स बसविण्याची मागणी केली होती. मात्र मागील चार वर्षांत दोन वेळा क्रेन्स उशिरा येत असल्याने जेएनपीटीच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचे मत जेएनपीटीचे कामगार विश्वस्त भूषण पाटील यांनी व्यक्त केले आहे. पुन्हा एकदा नवीन क्रेन्सची मागणी परदेशात नोंदविण्यात आलेली आहे. मात्र मागील दोन वेळेप्रमाणेच याही वेळी क्रेन्स वेळेत न आल्याने त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा होत असून फेब्रुवारीमध्ये येणाऱ्या क्रेन्स लांबल्या असून त्या आणखी सहा महिने लांबण्याची शक्यता असल्याची माहिती बंदर विभागातील सूत्रांनी दिली आहे. या संदर्भात जेएनपीटी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2014 1:20 am

Web Title: jnpts business again moving in gujarat
Next Stories
1 पनवेल नगरपालिकेच्या परिवहन सेवेचा करंजाडे येथे बस डेपो
2 सिडकोची अतिक्रमण हटाव मोहीम फक्त दिखाव्यासाठी
3 लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक
Just Now!
X