काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये जागांसाठी तणातणी सुरू असतानाच पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी २९ जागांची मागणी करून काँग्रेसला अडचणीत आणले आहे. २९ जागा देणे शक्य नसल्यास किमान ११ जागा सोडून पीरिपाचा सन्मान राखावा, असा आग्रह काँग्रेसकडे करणार असल्याचे प्रा. कवाडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रा. कवाडे यांनी काँग्रेसला पाठिंबा देऊन आमदारकी पदरात पाडून घेतली. येत्या विधानसभा निवडणुकीतही ही युती कायम राहणार आहे. पीरिपाने राज्यात २९ जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या जागांची व उमेदवारांची यादी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे पाठवली आहे. येत्या शनिवारी जागेबाबत निर्णय होणार आहे. त्यात किमान ११ जागा मिळाव्यात, यासाठी आग्रह धरणार असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.
११ जागाही न दिल्यास काय करणार, या प्रश्नाच्या उत्तरात काँग्रेस असे करणार नाही, असा विश्वास प्रा. कवाडे यांनी व्यक्त केला. स्वतंत्र विदर्भाबाबत काँग्रेस तळ्यात-मळ्यात करीत असली तरी निवडणूक झाल्यानंतर स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आमगाव ते खामगाव पदयात्रा काढून जनजागृती केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कालच देशातील पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट ओसरल्याचेच दिसून येत आहे. लोकांचा भाजपवरून विश्वास उडत चालला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातही आघाडी सरकारचीच
सत्ता येईल. या सत्तेत पीरिपाला सन्मानाने सहभागी करून घ्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

भीमसैनिकांचा राष्ट्रीय मेळावा २ ऑक्टोबरला
पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे येत्या २ ऑक्टोबरला मॉरिस कॉलेज मैदानावर भीमसैनिकांचा राष्ट्रीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात देशभरातून २५ हजार भीमसैनिक सहभागी होतील, अशी माहिती प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी दिली. बौद्ध विवाह कायदा, अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी, अनुसूचित जातीच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक उत्थानासाठी विशेष घटक योजनेच्या निधीचा पुरेपूर वापर, भूमीहिन शेतमजुरांना अतिक्रमित जमिनीचे पट्टे प्रदान करावे यासोबतच स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसंदर्भात आंदोलनाची रुपरेखा आखण्यात येईल. तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड व घोषणा सायंकाळी ५ वाजता मेळाव्याच्या खुल्या अधिवेशनात करण्यात येणार असल्याचेही प्रा. कवाडे यांनी सांगितले.