व्हिएतनाम युद्धातील शिरकाण पाहून सुन्न मनाने जीवन जगणारा एक कलाकार हरवलेल्या मनाच्या शोधात असताना त्याच्या आयुष्याला मिळालेल्या कलाटणीवर आधारित ‘ओश्तोरिज’ ही ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयाने सादर केलेली एकांकिका यंदा आयएनटी स्पर्धेत सर्वोत्तम ठरली. यानिमित्ताने प्रथमच आयएनटीचे विजेतेपद ठाण्यातील महाविद्यालयास मिळाले आहे.   
मनाचे मनोज्ञ वर्णन रामदासांच्या श्लोकांमधून, तर कधी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतून साकारलेले आहे. तेच मन रंगमंचावर साकारण्याचा प्रयत्न ठाण्यातील जोशी-बेडकर महाविद्यालयाच्या विद्यार्थानी आयएनटी स्पर्धेत केला. आतापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने मनाची वर्णने केली गेली आहेत. हेच मन रंगमंचावर मूर्त स्वरूपात दाखविण्याचा प्रयत्न आम्ही या नाटकाच्या माध्यमातून केल्याचे या नाटकात मध्यवर्ती भूमिका करणाऱ्या श्रेयस राजे याने सांगितले. आतापर्यंत मुंबईच्या महाविद्यालयांचा आयएनटीच्या स्पर्धेत दबदबा होता. ठाण्यातील महाविद्यालयांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागत होते. मात्र यंदाच्या वर्षी जोशी-बेडेकरचे विद्यार्थी पूर्ण तयारीनिशी या स्पर्धेत उतरले होते. स्पर्धेसाठी त्यांनी अनंत सामंत यांच्या ‘ओश्तोरिज’ या कादंबरीची निवड केली होती. पुस्तकाच्या भाषेला धरून काव्यात्मक वाटणारे संवाद, काल्पनिक असली तरी तितकीच प्रगल्भ कथा या नाटकाच्या निमित्ताने आम्ही साकारली याचे समाधान वाटते असे त्याने सांगितले.
दोन महिन्यांच्या अविरत प्रयत्नांनंतर सहा पात्रं असलेली ही एकांकिका या विद्यार्थानी रंगमंचावर साकारली होती. आयएनटीमध्ये या एकांकिकेचे सादरीकरण सगळ्यांच्याच पसंतीला उतरले होते. या स्पर्धेत ही एकांकिका सवरेत्कृष्ट ठरली. दिग्दर्शक अमोल भोर यास उत्कष्ट दिग्दर्शन, तृप्ती गायकवाडला उत्कृष्ट अभिनेत्री, तर उत्कृष्ट प्रकाश योजनेसाठी भूषण देसाई आणि उत्कृष्ट अभिनयाचा दुसरा क्रमांक श्रेयस राजे याला मिळाला. महाविद्यालयाच्या टॅलेंट अ‍ॅकॅडमीच्या समन्वयिका प्रा. मृण्मयी थत्ते यांनी या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
अशी आहे एकांकिका..
व्हिएतनाममध्ये छायाचित्रकार म्हणून कार्यरत असलेल्या केकोची ही कथा आहे. युद्धामुळे सुन्न मनाने तो एका घरात राहतो आहे. युद्धाच्या शिरकाणानंतर मन हरवल्याने तो केवळ एका यंत्राप्रमाणेच काम करतो. त्याच्या संवेदनाच हरवलेल्या असल्याने त्याची कलाही बोथट झालेली असते. अशावेळी त्याच्याकडे एका स्त्रीचे सुंदर फोटो काढण्याचे काम येते. या महिलेचे फोटो काढताना आणि तिच्याशी बोलताना त्याला आपले मन पुन्हा सापडेल असे वाटू लागते. हे सगळे प्रसंग अत्यंत कलात्मक पद्धतीने या एकांकिकेत या विद्यार्थानी साकारले आहेत.