प्र.के.अत्रे यांच्या उद्याच्या अग्रलेखात काय येणार याची त्यावेळच्या संपूर्ण मंत्रिमंडळाला धास्ती असायची. अत्रे, जांभेकर, टिळकांच्या काळातील पत्रकारिता जाणून घ्या, आता तशी पत्रकारिता करता येणार नाही. परंतु, जनता हीच परमेश्वरस्वरूप असून, आपण या जनतेचे वकील आहोत हे विसरू नका. थोर पुरूषांच्या विचाराने पत्रकारिता करून देश पुढे न्या. सध्या जनतेचा न्यायालय अन् पत्रकारांवरच असलेला विश्वास सार्थ ठरवा, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी केले.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त पत्रकार दिनी येथील कृष्णाकाठ पत्रकार संघातर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार’ देऊन डॉ. मेहेंदळे यांच्या हस्ते गौरविण्यात आले; त्या वेळी ते बोलत होते. सातारा जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष तुषार भद्रे अध्यक्षस्थानी होते. तर, प्रांताधिकारी संजय तेली, उपविभागीय पोलीस अधिकारी फत्तुलाल नायकवडी, प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, जिल्हा माहिती अधिकारी एस. आर. माने,  कराड पंचायत समितीचे उपसभापती विठ्ठलतात्या जाधव, दैनिक ‘कर्मयोगी’ च्या संपादिका मंगल लोखंडे यांची या वेळी उपस्थिती होती.
डॉ.मेहेंदळे म्हणाले की, चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीवर थाप मारल्याचे समाधान असून, गावातील गुणवंत मंडळी पद्मभूषण, पद्मश्री मिळवू शकणार नाहीत. पण, त्यांच्यासाठी हा सत्कार निश्चितच फार मोलाचा आहे. आज कोणाला बाबा आमटे, वि. दा. सावरकर व्हायचे नाही; प्रत्येकाला डॉक्टर, इंजिनीअर होऊन पैसे कमवायचे असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अल्प मोबदल्यात प्रामाणिकपणे काम करण्याचा पत्रकारितेचा धर्म आहे. प्रामाणिक पत्रकारितेची समाजाला नितांत गरज असल्याने बातमी शंभर टक्के वस्तुनिष्ठ असावी. बातमीचा पाठपुरावा व्हावा, पत्रकारिता बुवाबाजी होऊ नये याची दक्षता घ्या असेही आवाहन त्यांनी केले.
तुषार भद्रे म्हणाले की, योग्य आणि चांगले काम करणाऱ्यांचा सत्कार घेऊन आज कृष्णाकाठ पत्रकार संघाने पत्रकारितेतील संवेदनशीलता दाखवून दिली आहे. आजच्या स्पध्रेत पत्रकारांसमोर संवेदनशीलता जपण्याचे आव्हान असून, कुठलीही यंत्रणा पत्रकारांबरोबर नसते याचे भान ठेवा. पैसा, सुरक्षितता आणि प्रलोभनाच्या उद्देशाने पत्रकारिता करू नका. मर्यादा, संयम, निर्भीडता, प्रामाणिकपणा, विधायक दृष्टी, लढाऊपणा, विचारांचे सामथ्र्य, पत्रकारितेचा स्वतंत्र विचार जपा असे कळकळीचे आवाहन भद्रे यांनी केले.
संजय तेली म्हणाले की, पत्रकारांना समाज व शासनाचे पाठबळ मिळाल्यास ते खऱ्या अर्थाने निर्भीड व सडेतोड लिखाण करतील.
प्रास्ताविकात विकास भोसले यांनी ४७ पत्रकारांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या कृष्णाकाठ पत्रकार संघाचा आजचा हा कार्यक्रम यापुढेही कायम राहणार असल्याचे सांगितले. ज्येष्ठ पत्रकार शंकर पाटील, मोहन कुलकर्णी, कृष्णाकाठ पत्रकार संघाचे अध्यक्ष खंडू इंगळे यांच्यासह पत्रकार व नागरिकांची कार्यक्रमाला मोठी उपस्थिती होती.
‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार’ देऊन विविध क्षेत्रातील मान्यवरांना गौरविण्यात आले. त्यात पत्रकारितेतील कार्याबद्दल मुकुंद भट (ओगलेवाडी), शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दीपक म्होप्रेकर (कराड), सहकार क्षेत्रातील कार्याबद्दल जयंत संपतराव पाटील (कासेगाव), सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल मोहन दत्तू माळी (कराड) व शेखर गोरे (माण), कृषी क्षेत्रातील कार्याबद्दल सयाजीराव ताटे-पाटील (तासगाव), उद्योग क्षेत्रातील कार्याबद्दल तरूण उद्योजक अजितराव बानगुडे-पाटील (कराड), साहित्यिक क्षेत्रातील कार्याबद्दल विजयाताई पाटील (कराड), कामगार क्षेत्रातील कार्याबद्दल विजय शंकर खरात (कराड) तसेच क्रीडा क्षेत्रातील कार्याबद्दल कु. सुनीता जाधव (कराड) व कु. केतकी टकले (वारणानगर) या मान्यवरांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्काराने गौरविण्यात आले. येथील  सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाच्या प्रेक्षागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात पार पडला.