13 December 2017

News Flash

‘जल्लादा’च्या फाशीनंतर जल्लोष

कसाबला फाशी दिल्याचे वृत्त सकाळी पोहोचताच कामावर जाण्याच्या घाईत असलेल्या मुंबईकरांना सुखद धक्का बसला

प्रतिनिधी | Updated: November 22, 2012 1:15 AM

कसाबला फाशी दिल्याचे वृत्त सकाळी पोहोचताच कामावर जाण्याच्या घाईत असलेल्या मुंबईकरांना सुखद धक्का बसला अन् क्षणात सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. फटाक्यांची आतषबाजी सुरू होऊन मुंबईकरांनी पुन्हा जल्लोषात दिवाळी साजरी केली. अनेक ठिकाणी मिठाईदेखील वाटण्यात आली तर कसाबची छायाचित्रेही जाळण्यात आली. कसाबच्या फाशीची चर्चाच सर्वत्र होती.संसदेवरील हल्ल्यातील अफझल गुरूला अद्याप फाशी देण्यात न आल्यामुळे कसाबचा क्रमांक इतक्यात येणार नाही आणि या दहशतवाद्याला विनाकारण पोसावे लागणार, अशीच चर्चा चाकरमान्यांमध्ये सतत ऐकायला मिळत होती. परंतु अत्यंत गोपनीयपणे कसाबला फाशी दिल्याचे जाहीर होताच तमाम मुंबईकरांच्या उत्साहाला आनंदाचे भरतेच आले. बस थांबे, रेल्वे फलाट, गल्लोगल्ली फक्त कसाबच्या फाशीबद्दलच बोलले जाऊ लागले. अनेकांनी या कामगिरीबद्दल सरकारचे गोडवे गायला सुरूवात केली. सर्वपक्षीय कार्यालयांबाहेर अभिनंदनाचे फलक झळकले. फटाक्यांच्या माळा फुटू लागल्या. कसाबच्या फाशीचा जल्लोष मुंबईकरांनी एकत्रितपणे साजरा केला.पश्चिम द्रुतगती महामार्गावरील सकाळच्या वाहतूक कोंडीतही हाच विषय चघळला जात होता. रेल्वेगाडय़ांमध्येही प्रवाशांकडून याबाबत एकमेकांचे अभिनंदन केले जात होते. कसाबला फाशी दिल्याचा आनंद इतका दिसत होता की, अनेक ठिकाणी रस्त्यावरच मिठाई वाटण्यात आली. चाकरमान्यांना जेवणाचे डब्बे वेळेत पोहोचविणाऱ्या डब्बेवाल्यांनी कसाबची छायाचित्रे जाळून आपला आनंद व्यक्त केला. कसाबला फाशी म्हणजे दहशतवादाचा बीमोड, असे फलकही काही ठिकाणी लावण्यात आल्याचे दिसत होते. मुस्लिमबहुल बेहरामपाडय़ात रस्त्यावर येऊन आबालवृद्धांसह महिलांनीही जंगी जल्लोष केला. देशद्रोही कसाबला फाशी दिल्याबद्दल अभिनंदन करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने छत्रपती शिवाजी टर्मिनस बाहेर कसाबच्या पुतळ्याला जाहीर फाशी दिली तर भाजप कार्यकर्त्यांनी चर्चगेट येथील कार्यालयाबाहेर दिवाळी साजरी केली. सीएसटी तसेच चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर महाविद्यालयीन गट कसाबला फाशी दिल्याबद्दल जाहीरपणे घोषणा देत होते तर पादचारीही या युवकांना थांबून प्रतिसाद देत होते.. कसाबला फाशी दिले वगैरे ठीक आहे.. परंतु त्याच्या फाशीचा असा उत्साह साजरा करणे योग्य नसल्याचे मत काही सुधारणावादी व्यक्त करीत असताना त्याकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नव्हता..

 बाळासाहेब लागले कामाला, आदेश दिला यमाला..
गेले चार दिवस शोकाच्या छायेत वावरणाऱ्या शिवसैनिकांमध्ये आज जल्लोषाचे वातावरण पसरले.. अजमल कसाबला फासावर चढविल्याची बातमी सकाळी समजताच शिवसैनिकांचा उत्साह वाढला आणि काही ठिकाणी फटाकेही वाजले. कसाबला फासावर चढविण्याची बाळासाहेबांची मागणी त्यांच्या हयातीत पूर्ण झाली नव्हती, पण बाळासाहेबांच्या निधनानंतर चार दिवसांतच कसाबला फासावर चढविण्यात आल्याने बाळासाहेबांची अधुरी इच्छा पूर्ण झाल्याच्या भावनेने शिवसैनिक सुखावले. कसाबची फाशी हा बाळासाहेबांचाच करिष्मा असल्याची चर्चाही सुरू झाली आणि तसे एसएमएस फिरू लागले. ‘बाळासाहेब लागले कामाला, आदेश दिला यमाला, घेऊन ये कसाबला’.. अशा शब्दांत शिवसैनिकांच्या आनंदाची देवाणघेवाण सुरू झाली. काही ठिकाणी शिवसैनिकांनी या संदेशाचे फलकही झळकवले.

‘कसाबला फासावर चढवून सरकारने बाळासाहेबांना सर्वात चांगली श्रद्धांजली अर्पण केली’, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी व्यक्त केली, तर कसाबला फासावर चढविणे किती गरजेचे आहे, हे अखेर बाळासाहेबांनी देवालादेखील पटवून दिलेच, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करत अनेक शिवसैनिकांनी कसाबच्या फाशीबद्दल समाधान व्यक्त केले.राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्येही कसाबच्या फाशीमुळे आनंद पसरला. मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी सीएसटी स्थानकाच्या परिसरात कसाबच्या प्रतीकात्मक पुतळ्याला भर रस्त्यावर फासावर चढवून पेढे वाटत आपला आनंद व्यक्त केला.

 बुधवारी आला.. बुधवारीच मेला!
मुंबईवर दहशतवादी हल्ला करून अनेक लोकांचे प्राण घेणाऱ्या अजमल कसाबच्या आयुष्यात अखेरीस एक विचित्र योगायोग जुळून आला. कसाब भारताच्या भूमीवर, मुंबईत आला तो दिवस होता २६ नोव्हेंबर २००८. त्या दिवशी बुधवार होता. आणि आज त्याला फाशी झाली, तीदेखील बुधवारीच! चार वर्षांपूर्वी कसाब आपल्या इतर नऊ साथीदारांसह मुंबईतील बधवार पार्क येथे समुद्रामार्गे आला. मुंबईवरील या हल्ल्यात कसाबचे सर्व नऊ साथीदार मारले गेले. मात्र या हल्ल्यातील एकमेव जिवंत आरोपी असलेल्या कसाबला न्यायालयासमोर आणि संपूर्ण दोषी सिद्ध केल्यानंतर बुधवारी सकाळी फासावर लटकविण्यात आले.

 विश्वास बसत नाही
कसाबला फाशी झाली, यावर माझा विश्वासच बसत नव्हता. पण वृत्तवाहिन्यांवर एवढय़ा ठळकपणे दाखवत आहेत म्हटल्यावर ही बातमी खरीच असणार. माझ्या मते आता अफझल गुरुलाही फाशी व्हायला हवी. अफझल गुरुचा विचार करता कसाबला खूप लवकर फाशी झाली, असे म्हणावे लागेल. अफझल गुरू गेली दहा-बारा वर्षे पाहुणचार घेतोय. त्यालाही फाशी द्यावी.
जितेंद्र सिंग

 अधिक क्रूर शिक्षा हवी
अंदाधुंद गोळीबार करत अनेक निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या कसाबला फाशीपेक्षा खूप जास्त क्रूर शिक्षा व्हायला हवी होती. आपल्या देशाच्या ६५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका दहशतवाद्याला फाशी झाली असेल. त्या अर्थाने हे बरेच झाले. पण हा निर्णय सरकारने खूप लवकर घेण्याची गरज होती. त्याच्यावर आतापर्यंत अमाप पैसा सरकारने खर्च केला. माझ्या मते अफझल गुरूलाही त्याच्याबरोबरच फासावर लटकवायला हवे होते.
विजय नेसवणकर

 जाहीर फाशी द्यायला हवी होती
कसाबचे कृत्य अतिशय अमानुष होते. त्यामुळे त्याला जाहीर फाशी द्यायला हवी होती. अशाने इतरांवरही वचक बसला असता आणि त्यांनी आपल्या भारताकडे वाकडय़ा नजरेने पाहण्याआधी दहा वेळा विचार केला असता. कसाबला, क्रांतिवीर चित्रपटात दाखवल्याप्रमाणे, आझाद मैदानात सर्वासमोर फाशी द्यायला हवी होती. आणखी एक गोष्ट म्हणजे, त्याला हल्ल्यानंतर लगेच फाशी द्यायला हवी होती. त्याला तब्बल चार वर्षे आमच्याच पैशांवर पोसल्यानंतर फाशी दिल्याने आनंद असा काही वाटतच नाही. हल्ल्यानंतर लगेचच फाशी दिली असती, तर ते जास्त योग्य ठरले असते.
सुरेश मास्कर

 अफझल गुरूचा नंबर कधी?
कसाबला फाशी दिल्याची बातमी समजल्यानंतर खूप आनंद झाला. जी व्यक्ती चुकीचे काम करते तिला शिक्षा ही मिळालीच पाहिजे. पण त्याच्यावर एवढा खर्च करण्याची काहीच गरज नव्हती. त्याच्या सुरक्षेवर लाखो रुपये, खाण्यावर हजारो रुपये खर्च केले आणि देशातला आमच्यासारखा सामान्य माणूस दर दिवशी जगण्यासाठी झगडत आहे. याचा संपूर्ण दोष सरकारला जातो. कसाबला तर फाशी झाली, पण आता अफझल गुरूला कधी होणार?
एम. एस. खान

 देर आये, दुरुस्त आये!
कसाबला फाशी झाल्याचे वृत्त ऐकल्यानंतर एकच म्हण आठवली, ‘देर आये, दुरुस्त आये’. खरे तर सामान्य माणसाने त्याला फाशी होईल, याची आशाच सोडली होती. पण अखेर सरकारने त्याला फासावर लटकवून आम्हा सामान्यजनांना दिलासा दिला. आता अफझल गुरूलाही लवकरात लवकर फाशी व्हायला हवी.
मधुकर नायक

कसाबची फाशी ही राजकीय चाल वाटली
कसाबला फाशी दिली हे चांगले झाले. मात्र, अघोरी कृत्य करणाऱ्या या दहशतवाद्याला शिक्षा होण्यासाठी चार वर्ष का जावी लागली?, फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब झाल्यानंतरही त्याला प्रत्यक्ष फाशी होण्यासाठी दोन वर्ष लोकांना वाट पहावी लागली. खरेतर, कसाबसारख्या दहशतवाद्याला शिक्षा होणे हे राजकीय इच्छाशक्तीवरच अवलंबून होते. तरीही एवढे वर्ष न्यायालयीन प्रक्रियेच्या नावाखाली लोकांना वाट पहावी लागली. त्यामुळे २०१४ च्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवूनच कसाबला फाशी दिली गेली आहे, असे वाटते.
अतुल तेली

ही वृत्ती संपवली पाहिजे
कसाबने जे केले होते ते अत्यंत क्रूर होते आणि त्याची शिक्षाही त्याला फाशीच्या रूपाने मिळाली आहे. पण, काही असले तरी एक जीव गेला आहे त्याबद्दल आनंदोत्सव साजरा होणे चुकीचे वाटते. कसाब गेला असला तरी दहशतवादी वृत्ती संपलेली नाही. आपण त्याच्यावर करोडो रूपये खर्च केले पण त्या घटनेपासून धडा घेऊन आपली सुरक्षायंत्रणा आता भक्कम झाली आहे, असे आपण छातीठोकपणे सांगू शकतो का? आपण या शहरात, या देशात सुरक्षित आहोत का?, हा प्रश्न अजूनही विचार करायला लावतो. त्यामुळे एका कसाबला मारून काही होणार नाही तर त्यांची दहशतवादी वृत्ती जी आहे ती संपवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
प्राजक्ता देसाई

कसाबला लोकांसमोर फाशी द्यायला हवी होती
कसाबला इतक्या गुपचूप फाशी का दिली गेली? त्याला जाहीरपणे फाशी द्यायला हवी होती म्हणजे लोकांच्या मनातला राग, त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया कसाबपर्यंत पोहोचल्या असत्या. आपण कसाबवर खटला चालवण्यासाठी करोडो रूपये आणि वेळ खर्च केला. या चार वर्षांत २६/११ च्या दुर्घटनेतील लोकांना काय मिळाले तर प्रचंड ताण.. कसाबला फाशीची शिक्षा होणार की नाही आणि कधी होणार यासाठी त्या लोकांना इतकी वर्ष वाट का पहावी लागली, याचे उत्तर अजून मिळालेले नाही. कसाबला याआधीच फाशी झाली असती तर अधिक चांगले झाले असते.
सचिन वाडेकर

कसाबला याआधीच फाशी व्हायला हवी होती
कसाबला फाशी मिळाली हे ऐकून बरे वाटले पण, हे असे अचानक कसे झाले हे कोडे उलगडले नाही. ज्या क्रूरकम्र्याला फाशी व्हावी म्हणून इतकी वर्ष वाट पहात होतो त्याला अशी अचानक आणि गुपचूपपणे फाशी कशी दिली? कसाबला याआधीच फाशी व्हायला हवी होती. कसाबसारख्या दहशतवाद्यांवरचे खटले लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी वेगळे प्रयत्न व्हायला हवेत.
अमोल कुडाळकर

कसाबला फाशीशिवाय दुसरी शिक्षाच नव्हती
कसाबला फाशी दिली हे बरोबरच झाले. त्याने जो हिंसाचार इथे केला त्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षाच नव्हती. पण, त्याला फाशी दिली म्हणजे सारे संपले असे होत नाही. त्याला फाशी झाली म्हणून आपण आनंदोत्सव साजरा करायचा हे ठीक नाही. कारण, माणूसकीचे महत्त्व पाकिस्तान आणि तिथले दहशतवादी विसरले असतील पण, आपण भारतीय आहोत. आपली मूल्ये, शिकवण त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने सरस आहेत. मात्र, या आनंदाच्या नादात आपण आपली माणूसकी विसरता कामा नये, असे मला वाटते.
चंदन चौधरी

First Published on November 22, 2012 1:15 am

Web Title: jubilation after hang
टॅग Hanger,Kasab,Reactions