संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड तथा जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी अफझल गुरू यास अखेर फासावर चढविण्यात आल्याचे वृत्त सकाळी झळकताच सोलापूर शहर व परिसरात नागरिकांनी जल्लोष केला. या फाशीचे सर्वत्र स्वागत करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कार्यकाळात मुंबई हल्ल्यातील पाक दहशतवादी अजमल कसाबनंतर आता संसदेवरील हल्ल्यातील दहशतवादी अफझल गुरू यालादेखील फासावर लटविण्यात आल्याबद्दल सोलापुरात शिंदेसमर्थक काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. सुशीलकुमार शिंदे हे गृहमंत्री म्हणून कणखर पावले उचलत असल्याचे प्रत्यंतर या घटनेतून स्पष्ट होते, असा दावा काँग्रेसचे शहराध्यक्ष धर्मा भोसले यांनी केला.
अफझल गुरूला सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावूनदेखील त्याला फासावर लटकावले जात नाही म्हणून भाजप-सेना युतीसह हिंदुत्ववादी संघटनांकडून काँग्रेसच्या अधिपत्याखालील केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले जात होते. परंतु राष्ट्रपतींनी अफझल गुरूला फाशीच्या शिक्षेबाबत दया नाकारताच या खतरनाक दहशतवाद्याला फासावर लटकावण्यात आल्याबद्दल गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह केंद्र सरकारचे अभिनंदन करण्यात आले. तर शिवसेनेच्या वतीने सकाळी दत्त चौकात जल्लोष करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफझलखानाला ठार मारल्याच्या घटनेच्या छायाचित्राचा आधार घेऊन ‘हिरवा दहशतवाद असाच संपवायचा असतो’ असा संदेश देणारे फलक रस्त्यावरून फिरविण्यात आले. शिवसेना शहरप्रमुख प्रताप चव्हाण, विद्यार्थी सेना सहसंपर्कप्रमुख महेश धाराशिवकर, विजय पुकाळे आदी शिवसैनिकांनी या जल्लोषात भाग घेतला होता.